क्रिकेटचा किस्सा! सकाळी 9 वाजेपर्यंत दारू ढोसत बसले अन् मैदानात उतरताच दीडशतक ठोकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू मैदानात जेवढे आक्रमकपणे खेळतात तेवढेच ते मैदानाबाहेर मजामस्ती करतात. आज वेस्ट इंडिजची टीम मैदानावर कच्ची दिसत असली एक काळ या टीमने विरोधी टीमला सळो की पळो करून सोडले होते. 1970-80 च्या काळामध्ये तर वेस्ट इंडिजची टीम क्रिकेटमधील दादा होती. आज आपण 70-80 च्या दशकामध्ये घडलेली गोष्ट जाणून घेणार आहोत.

1973 ला वेस्ट इंडिजची टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती. पहिली कसोटी वेस्ट इंडिजने जिंकली, तर दुसरी अनिर्णित राहिली. तिसरी कसोटी 23 ऑगस्टपासून जगप्रसिद्ध लॉर्डस मैदानावर सुरू झाली. वेस्ट इंडिजची टीम रोहन कन्हाई (Rohan Kanhai) यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली आणि पहिल्या डावात डोंगर रचला. इंग्लंडची टीम पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा पूर्ण संघ बाद करू शकली नाही. वेस्ट इंडिजने पहिला डाव 8 बाद 652 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजकडून दिग्गज फलंदाज गॅरी सोबर्स यांनी दीडशतक ठोकले.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ते 31 धावांवर नाबाद होते. हुल्लडबाज स्वभाव असणारे गॅरी सोबर्स पहिला डाव संपल्यानंतर रात्री क्लाईव्ह लॉईड यांच्यासोबत जेवणाला गेले. जेवण करून लॉईड हॉटेलवर माघारी परतले, पण सोबर्स वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू रेज स्कारलेट यांच्यासोबत थेट नाईटक्लबला पोहोचले. येथे दोघांनी मजबूत दारू प्यायली. आपल्याला जास्त झोपेची गरज नाही असे वाटल्याने ते रात्रभर दारू पित बसले.

दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता सोबर्स नाईटक्लबमधून हॉटेलच्या रुमवर परतले. त्यानंतर त्यांनी गरम पाण्याने आंघोळ केली, पॅड घातले आणि थेट मैदानात उतरले. वेस्ट इंडिजच्या सर्व खेळाडूंना त्यांनी रात्रभर दारू ढोसल्याचे माहिती होते. त्यात सोबर्स यांच्यासमोर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बॉब विलिस होता. आपल्याला त्यावेळी विलिसचा फक्त हात आणि पाय दिसत होते असे सोबर्स यांनी सांगितले. विलिस यांचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अन् पाचवा चेंडूही सोबर्स यांना खेळता आला नाही. त्यामुळे पवेलियनमध्ये बसलेले त्यांचे साथिदारही खुदूखुदू हसू लागले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि थेट शतक ठोकूनच थांबले.

शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर त्यांचे पोट दुखू लागले. त्यांना निट उभेही राहता येत नव्हते. लॉर्डसवरील कडक उन्हामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. ड्रिंक्स ब्रेकमध्ये ते रिटायर हर्ट बाहेर गेले आणि कर्णधार रोहन कन्हाई यांना आपबिती सांगितली. त्यांनी सोबर्स यांच्यासाठी ब्रांडी मागवली. सोबर्सही ड्रिंक घटाघटा प्यायले आणि आराम करू लागले. त्यानंतर एक खेळाडू बाद झाल्यानंतर ते मैदानात उतरले आणि दीडशतक ठोकले. त्यानंतर लगेचच वेस्ट इंडिजने डाव घोषित केला.