
सामना प्रतिनिधी । हडोळती
हडोळती येथील आठवडी बाजारात गणेशोत्सव व महालक्ष्मी उत्सवानिमित्त लागणारे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहेत. महालक्ष्मीचे मुखवटे, दागीने व इतर सजावटीच्या साहित्यांनी हडोळती आठवडी बाजार सजला आहे. कापडाचे हात, तयार मुखवटे घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.
श्रावणातल्या व्रत वैकल्याची धामधूम आता संपत असतानाच गृहिणींना वेध लागतात ते गौरी गणपतीचे. गणेशोत्सवात साधारण तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते. गौरी मुखवटे जोडी ३०० रुपये, गौरी कापडी हात २०० रुपये, गौरीच्या कोथळ्या ४०० रुपये जोडी, गौरी पिलावळे मुखवटे १५० रुपये जोडी या दरामध्ये आकर्षक महालक्ष्मी मुखवटे बाजारात दाखल झाले आहेत.
या बाजारामध्ये मुखवटा विक्रेत प्रल्हाद वागीलवार यांनी सामनाशी बोलतांना गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दर कमी असल्याचे सांगितले. गौरीला साडी नेसविण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र शिऊन मिळणाऱ्या तयार (रेडीमेड) साडी, नऊवारी घेण्याकडे महिलांचा कल वाढत असल्याचे व्यापारी सांगत होते. दागिन्याची रेंज हार, कानातले, बिंदी, बांगड्या, बाजूबंद, कमरपट्टा, हल्ला, लक्ष्मी हार, मंगळसूत्र, एकदाणी असे अनेक प्रकारचे रेडीमेड दागिने दाखल झाल्याचे पहावयास मिळत होते.





























































