गौतम गंभीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा सलामीवीर, 2007 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या विश्वविजयी संघाचा सदस्य, दिल्लीकर गौतम गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. मंगळवारी सायंकाळी गंभीरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

गौतम गंभीरने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, ‘आयुष्यातील हा सर्वात कठीण निर्णय होता. ह्रदयावर दगड ठेऊन मी हा निर्णय घेतला आहे. बऱ्याच दिवसांपासून मी या दिवसाची वाट पाहात होतो. माझ्या कारकीर्दीमध्ये मला मदत करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद.’

दोन वर्षापासून संघाबाहेर
गौतम गंभीर गेल्या दोन वर्षापासून टीम इंडियातून बाहेर आहे. काही दिवसांपूर्वी 37 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या गंभीरसाठी संघाचे दरवाजे जवळपास बंदच झाले होते. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांना पूर्णविराम देत त्याने निवृत्ती जाहीर केली.

जबरदस्त कामगिरी
गौतम गंभीरने आपल्या जबरदस्त खेळीने टीम इंडियाला अनेक एकहाती विजय मिळवून दिले आहेत. गंभीरने 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामने खेळले. 58 कसोटीत गंभीरने 41.96 च्या सरासरीने 4154 धावा केल्या. यात त्याच्या 9 शतकांचा समावेश आहे. 147 एक दिवसीय सामन्यात गंभीरने 39.68 च्या सरासरीने 11 शतकांसह 5238 धावा चोपल्या तर 37 टी सामन्यात सात अर्धशतकांसह त्याने 932 धावा केल्या.

दोन विश्वचषकाचा मानकरी
गौतम गंभीर आपल्या शानदार कारकीर्दीमध्ये टीम इंडियाला 2007 मध्ये झालेला टी-20 आणि 2011 मध्ये झालेला एक दिवसीय विश्वचषक जिंकून दिला. 2007 आणि 2011 मधील फायनलमध्ये सर्वाधिक धावा गंभीरनेच काढल्या होत्या. 2007 ला पाकिस्तानविरुद्ध 75 तर 2011 ला श्रीलंकेविरुद्ध 97 धावांची खेळी गंभीरने साकारली होती.