
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू आणि सलामीचा फलंदाज गौतम गंभीरने सडेतोड उत्तर दिले. हिंदुस्थानात अजूनही पाकिस्तानींना वैद्यकीय व्हिसा मिळतो, तुला मानसोपचारतज्ञाची गरज असून मी स्वतः तुला डॉक्टरकडे घेऊन जातो असे उत्तर गंभीरने आफ्रिदीला दिले. आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात गंभीरबद्दलचे मत व्यक्त केले असून गंभीरला स्वतःचे व्यक्तिमत्त्व नाही. तो खूप अहंकारी आहे असे म्हटले होते. त्यावर गंभीरने ट्विटरवरून पलटवार केला आहे.
गंभीरच्या नावावर एकही विक्रम नाही तरीही त्याच्यात अहंकार ठासून भरला आहे. एका सामन्यादरम्यान शाहीद आणि गंभीर यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. त्यानंतर दोघांचेही संबंध कधीच सुधारले नाहीत. याबद्दल आफ्रिदीने लिहिले आहे की, काहीजणांशी खासगी शत्रुत्व असते तर काहीजणांशी कामासंबंधात. परंतु गंभीर एकदम विचित्र आहे. गंभीर हा डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉण्ड यांचे मिश्रण असून अशा लोकांना आमच्याकडे कराचीत सनकी म्हणतात. तुम्ही रागीट असाल आणि एक स्पर्धक म्हणून समोरच्याला पाहत असाल तर आमची काहीच हरकत नाही पण तुम्ही सकारात्मक असायला हवे. परंतु गंभीर तसा अजिबातच नव्हता, असेही आफ्रिदीने म्हटले आहे.
























































