‘त्या’ दोघींना स्टंटबाजी पडली महागात, 28 हजारांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सोशल मिडीयावर बाईकवर स्टंटबाजी करणाऱ्या दोन मुलींचा व्हिडीओ प्रचंड वायरल होतोय. अनेकांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. मात्र नियमांना केराची टोपली दाखवत दोघींनी केलेली धोकादायक स्टंटबाजी त्यांना चांगलीच महागात पडली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने या तरुणींना तब्बल 28 हजारांचा दंडाचे चलन पाठवले आहे.

हा व्हिडिओ या तरुणींनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. शिवांगी दबास आणि स्नेहा रघुवंशी अशी त्या स्टंटबाज तरुणींची नावे आहेत. यामध्ये दोन तरुणी लाल रंगाचे टी-शर्ट आणि काळ्या रंगाची ट्राऊजर घालून रॉयल एनफिल्ड चालवत आहेत. या दोघीही कुस्तीपटू असून दोघीही विशीतल्या आहेत. या दोघींना नुकतेच लर्निंग लायसन्स मिळाले आहे. या व्हिडीओत शिवांगी भरधाव वेगात बाईक चालवणाऱ्या स्नेहाच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. निव्वळ मजा म्हणून या दोघींनी हे असले प्रकार केले होते.  बाईक चालवताना या दोघींनी हेल्मेट घातले नव्हते. सार्वजनिक ठिकाणी भरधाव वेगात दोघी बाईक चालवत होत्या. यामुळे पोलिसांनी त्यांना वाहतूक कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. दंडाचे चलन निघाल्यानंतर शिवांगीने म्हटलंय की त्या दोघी स्टंटचा सराव करत होत्या आणि त्यावेळी घेतलेला व्हिडीओ हा इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचल्याने गाझियाबाद वाहतूक पोलिसांनी 28 हजारांचे चलन पाठवले आहे.