हडळ दांपत्याकडे सापडला स्फोटकांचा साठा, पालघरमध्ये खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
recovered 183 gelatin sticks

सामना ऑनलाईन । पालघर

चांदीप येथील तानसा नदीकिनारी सोमवारी जिलेटीन कांड्यांसह स्फोटके जप्त केल्यानंतर मांडवी क्षेत्राच्या हद्दीत एका कुटुंबाकडे स्फोटकाचा मोठा साठा सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाला असून शहरात घातपाताचाही संशय व्यक्त करण्यात येतोय. इतका मोठा स्फोटक साठा जिल्ह्यात आलाच कुठून असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर हिंदुस्थानचे दहशतवादी तळांवर हवाई हल्ले यांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्वाच्या शहरांत तसेच परिसरात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. संशयितांची चौकशी देखील करण्यात येत आहे. मांडवी क्षेत्राच्या हद्दीत विरार पोलिसांनी छापा टाकला असता एकूण 24 इलेक्ट्रोनिक डेटोनेटर जप्त करण्यात आली. दरम्यान सदर स्फोटकाचा कसून तपास केला असता सायावन येथील एका बंगल्यात स्फोटके असल्याची माहिती मिळाली. अशा एका शोध मोहिमेत पालघरमध्ये एका घरावर छापा टाकण्यात आला. या घरातील दांपत्याकडे स्फोटकांचा मोठा साठा सापडला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

साहाय्यक पोलीस अधीक्षक बीटी धांडट यांनी दिलेल्या माहितीनुसार, 183 जिलेटीनच्या कांड्या, 103 इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर्स, 345 नॉन इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर्स, 21 सेफ्टी फेज जप्त करण्यात आले आहेत. यावेळी बंगल्याचे मालक तुकाराम हडळ आणि मालकीण बिना हडळ यांना अटक करण्यात आली. दरम्यान बंगल्याचे मालक कशासाठी स्फोटके वापरणार होते याची अद्याप स्पष्ट माहिती नाही.