
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. नुकतेच या चित्रपटातील पहिले गीत ‘वेड तुझा’ प्रदर्शित झाले होते. त्या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यानंतर आता ‘वेड’च्या निर्मात्यांनी चित्रपटातील ‘बेसुरी’ हे गाणे प्रदर्शित केले आहे. हे गाणे वसुंधरा वी यांनी गायले आहे आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे.
‘बेसुरी’ गाण्यात रितेश आणि जिनिलीया देशमुख शाळकरी मुलांच्या रूपात दिसत आहेत. या चित्रपटातून जिनिलीया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. तर रितेश देशमुखने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात जिनिलीया आणि रितेशसह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच शुभंकर तावडे आणि जिया शंकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.































































