गेवराई धान्य घोटाळा प्रकरणात गोदामपाल संजय राजपूत अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेवराई तालुक्यातील लाख रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणी पोलिसांनी गोदामपाल संजय राजपूतला अटक केली आहे. या प्रकरणी भाजप नगरसेविकेचा पती अरुण म्हस्के प्रमुख आरोपी असून तो फरार असल्यामुळे दोन दिवसापूर्वीच मस्केच्या भावास पोलिसांनी अटक केली होती. गोदामपालाच्या अटकेने अनेक बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेवराई येथील पांढरवाडी रस्त्यावर असलेल्या एका खाजगी गोडाऊनमध्ये पाच मे बुधवार रोजी बीड पोलिसांनी छापा मारला होता. या कारवाईत सहा ट्रक, सहा लाख रुपयांचा जीवनावश्यक वस्तूंचा गहू तांदूळ व साखरेचा साठा जप्त करण्यात आला होता. या बहुचर्चित घोटाळ्यांमध्ये भाजपा नगरसेविकाचा पती अरुण मस्के मुख्य आरोपी आहे. दोन दिवसापूर्वीच त्याचा भाऊ मोहन मस्के यास पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.

आता गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेला शासकीय गोदामपाल संजय राजपूत यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. तलवाडा व मादळमोही येथील गोदामपाल म्हणून तो कार्यरत आहे. राजपूतच्या अटकेमुळे पुरवठा विभागातील बडे मासे प्रशासनाच्या रडारवर आहेत, त्यांची चौकशी देखील सुरू झाल्याचे समजते.