घणसोलीतील अडीच हजार बेकायदा घरांना नोटिसा, नवी मुंबईत सिडकोचा बुलडोझर सुसाट

पावसाळा संपल्यानंतर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी विभागाचा बुलडोझर सुसाट निघाला आहे. तोडफोड कारवाई गतिमान करण्यासाठी सिडकोने नवी मुंबई, पनवेल आणि उरणमधील साडेतीन हजार बेकायदा घरांना नोटिसा पाठवल्या असून त्यामध्ये एकट्या घणसोलीतील अडीच हजार घरांचा समावेश आहे. नवी मुंबईत दिघापाठोपाठ घणसोली हे अनधिकृत बांधकामांचे नवीन हब तयार झाले आहे. येथील अनधिकृत इमले हटवण्यासाठी सिडकोने आता विशेष पुढाकार घेतला आहे.

न्यायालयाच्या गाईडलाईननुसार पावसाळ्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करता येत नाही. याचाच गैरफायदा घेऊन नवी मुंबईतील अनेक भूमाफियांनी शहरात हजारो इमारती उभ्या केल्या आहेत. या इमारती तोडण्याचा धडाका आता सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी लावला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक दिवशी नियमितपणे अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. पाच ते सहा मजल्यांच्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. आता ही तोडफोड मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी सिडकोने नवी मुंबई, पनवेल आणि उरणमधील ३ हजार ७०० बेकायदा घरांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामध्ये एकट्या घणसोली नोडमधील २ हजार ४३९ घरांचा समावेश आहे.
गेल्या पाच वर्षांत घणसोली नोडमध्ये विजेच्या वेगाने अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. सिडकोने महापालिकेला दिलेले भूखंडही भूमाफियांनी गिळंकृत केले आहेत.

बेकायदा इमल्यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. काही ठिकाणी पाया पूर्णपणे न खोदता इमारत उभी करण्यात आली आहे. त्यामुळे पोकलेनच्या एका फटक्यात संपूर्ण इमारत पत्त्यासारखी खाली येत आहे. सिडकोने बेलापूरमधील २८१, ऐरोलीमधील २०९, खारघरमधील १६७, सानपाडामधील १२९ अनधिकृत घरांना नोटिसा पाठवल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नोटिसा आल्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांची

कारवाई होणारच
सिडकोने कारवाई करण्यासाठी या बांधकामांना नोटिसा पाठवल्या आहेत. प्रथम रहिवासी वापर होत नसलेल्या इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य अनधिकृत बांधकामांना लक्ष्य करण्यात येणार आहे, असा इशारा सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी दिला आहे. नोटिसा पाठवलेल्या इमारतींमध्ये नागरिकांनी घरे घेऊ नयेत असे आवाहन त्यांनी केले आहे.