…तर घाटकोपरची दुर्घटना टळली असती! पुण्यातील होर्डिंग प्रकरणानंतरही सरकारचा निष्काळजीपणा उघड

वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने सोमवारी संध्याकाळी मुंबईतील घाटकोपर येथील एक मोठे होर्डिंग कोसळले. या अपघातातील मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. तर 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. होर्डिंगच्या जागेवरून रेल्वे मंत्रालय आणि पालिकेत ढकलाढकली सुरू झाली आहे. दरम्यान, या निमित्ताने राज्य सरकारचा निष्काळजीपणा उघड झाल्याची टीका सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये एप्रिल महिन्यात कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. हे होर्डिंग अनधिकृत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 434 बेकायदा आणि धोकादायक होर्डिंग्ज पाडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र किवळे दुर्घटनेतून राज्य सरकारने काहीच धडा न घेतल्याचं या निमित्ताने उघड झालं आहे.

कारण, किवळे दुर्घटनेनंतर अवाढव्य आकाराचे अनधिकृत होर्डिंग हे धोकादायक असल्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग पाडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात अशा प्रकारे अनधिकृतरित्या उभे असणारे आणि धोकादायक असलेले होर्डिंग पाडण्यासाठी मोहीम राबवणं आवश्यक होतं. मात्र राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे 14 जीव गेल्याची टीका सर्वत्र होताना दिसत आहे.