
पाण्याची डबकी, गटारींची अस्वच्छता, कचऱ्याचा ढीग यांमुळे घोडेगाव शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊनदेखील अन् ग्रामपंचायतीने धूळफवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आंबेगाव तहसील कार्यालय, घोडेगाव न्यायालय, भूमिअभिलेख, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, पोलीस ठाणे, दुय्यम निबंधक कार्यालय आदी विविध शासकीय कार्यालये घोडेगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये येत असून, लोकसंख्या 10 हजारांहून अधिक आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वांत मोठी घोडेगाव ग्रामपंचायत ओळखली जाते. मात्र, काही दिवसांपूर्वी गढूळ पाण्यामुळे घोडेगावमध्ये सुमारे 250 हून अधिक नागरिकांना जुलाब, पोटदुखी यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागले. ग्रामपंचायतीकडून घरोघरी ‘मेडिक्लोर’चे वाटप केले असल्याचे घोडेगाव ग्रामपंचायत पदाधिकारी सांगत असले, तरी बहुतेक नागरिक ‘मेडिक्लोर’ मिळाले नसल्याचे सांगत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना विचारले असता, नवीन रस्ता होणार असल्याचे गेल्या दीड वर्षांपासून सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष कोणतेही काम झालेले नाही.
सध्या घोडेगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांवर डबकी साचलेली आहेत. बंदिस्त गटारी वेळोवेळी साफ होत नाहीत. उघड्या गटारींचे पाणी रस्त्यांवर वाहत असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग, डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी ग्रामसभेमध्ये घरोघरी ‘मेडिक्लोर’चे वाटप करणे, कचऱ्याचे ढीग उचलणे, धूरफवारणी करणे, रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित भरणे आदी सूचना केल्या होत्या. मात्र, याकडे ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी यांनी दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झाला नाही.