
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि जवळपासच्या भागात पिकणारा हापूस हाच खरा हापूस असल्याचे सरकारने मान्य केले आहे. या भागात पिकणाऱ्या आंब्याला सरकारने आता जिओग्राफीकल इंडिकेशन (जीआय) टॅग दिला आहे. त्यामुळे हापूस आंबे देशात कुठेही पिकवा आणि विका, पण अस्सल हापूस आंबा पाहिजे असेल तर कोकणचाच हापूस हाच अस्सल मानला जाईल, यावर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याने आज शिक्कामोर्तब केले आहे.
हापूस आंबा जगभर विकला जातो. या आधी तो जपान, कोरिया आणि युरोपमध्येही विकला जात होता. गेल्या काही वर्षांत तो अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही जाऊ लागला आहे. पण, आता जीआय टॅगमुळे कोकणचा हापूस सगळीकडे भाव खाणार आहे. हापूस आंब्यावर अवलंबून असलेल्या कोकणच्या हापूस उत्पादकांना आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून कोणता हापूस आंबा हा अस्सल हापूस यावर वाद होता. तो वाद काही महिन्यांपूर्वीच निकालात निघाला. रत्नागिरी, देवगड असा कोणताही हापूस नसून हापूस हा कोकणचाच आहे, यावर शिक्कामोर्तब झाले होते.
जीआय टॅगवाली फळे
हापूस आंब्याआधी 2004 साली दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, जयपूरची निळ्या रंगाची मातीची भांडी, बनारसी साडी आणि तिरुपतीचे लाडू यांनाही जीआय टॅग मिळाला आहे. त्यामुळे अस्सल फळेच ग्राहकांना खरेदी करता येतात.
जीआय टॅग म्हणजे पेटंट
विशिष्ट परिसरात पिकणाऱ्या फळाला त्या त्या परिसरानुसार रंग, रूप, गंध आणि चव असते. त्यामुळे त्या फळाला विशिष्ट दर्जा मिळतो. आंब्यालाही अशा प्रकारचा दर्जा आहे. मात्र आता कोकणच्या हापूस आंब्याला जीआय टॅग देऊन त्याचा अस्सलपणा मान्य केला आहे. थोडक्यात, जीआय टॅग म्हणजे त्या वस्तूच्या अस्सलपणाचे ‘पेटंट’च असेल.


























































