
दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथे अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून तंबाखूयुक्त प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. या कारवाईत सुमारे 7 हजार 322 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित दुकानदाराविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिम्हवणे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या ‘श्री स्टोअर्स’ या दुकानात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसाठी साठवणूक करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संकेत शंकरराव कोणेरी यांच्या पथकाने सोमवारी दुपारी कारवाई करत दुकानाची तपासणी केली. या तपासणीदरम्यान केसरयुक्त विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, आरएमडी पान मसाला आदी तंबाखूयुक्त पदार्थांचा साठा आढळून आला. हे पदार्थ राज्य शासनाने प्रतिबंधित केलेले असून मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या कारवाईत एकूण 7 हजार 322 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी समीर दामोदर महाडिक (वय 52, रा. गिम्हवणे) याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त संकेत कोणेरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित दुकानात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच नियम 2011 अंतर्गत प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थांची विक्रीसाठी साठवणूक करण्यात आली होती. अशा पदार्थांचे सेवन मानवी आरोग्यास हानिकारक असून त्याचा परिणाम भावी पिढीच्या जनुकीय संरचनेवरही होऊ शकतो, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच आरोपीकडे सदर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा कोठून आणला याबाबत विचारणा करण्यात आली असता त्याने कोणतेही समाधानकारक तपशील सादर केले नसल्याचेही समोर आले आहे. प्रतिबंधित असल्याची माहिती असूनही हे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने संबंधितांवर भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि नियम 2011 मधील विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोहीम तीव्र केली असून अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.































































