गिरगावचे ऐतिहासिक ऑडिटोरियम पुन्हा सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
girgaon historical auditorium

सामना प्रतिनिधी । मुंबई

गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राजवळ होणाऱया जेट्टीच्या विकासात या ठिकाणचे ऐतिहासिक ऑडिटोरियमदेखील पुन्हा सुरू होणार आहे. अनेक कलाकार घडवलेल्या या ऑडिटोरियमचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी या ठिकाणी प्रशस्थ कलादालन उभारण्यात येणार आहे. जेट्टी उभारताना ऑडिटोरियमचे ऐतिहासिक वैभव टिकवून ठेवावे अशी मागणी शिवसेनेने केली होती.

गिरगाव येथे 6472.76 चौरस मीटर जागेवर बिर्ला क्रीडा केंद्र आहे. या ठिकाणची 450.18 चौरस मीटर जागा पर्यटनाला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱया बहुउद्देशीय जेट्टीसाठी पालिका मुंबई पोर्ट ट्रस्टला देणार आहे. या बदल्यात राज्य शासनाकडून 500 चौरस मीटर जागाही पालिकेला गिरगाव येथे कोस्टल रोडसाठी मिळणार आहे. मात्र या कला-क्रीडा केंद्रात एकेकाळी असणाऱया ऑडिटोरियमशी मराठी, गुजराती, हिंदी कलाकारांची आस्था जोडलेली आहे. विविध भाषिक कलाकार या ठिकाणाहून घडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या ऑडिटोरियमबाबत पालिकेची काय भूमिका आहे अशी भूमिका शिवसेनेने मांडली. ऑडिटोरियमबाबत पालिकेचा काय प्लॅन आहे, असा सवाल श्रद्धा जाधव यांनी केला. या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच प्रस्ताव मंजूर करावा असे अनंत (बाळा) नर म्हणाले. ऐतिहासिक ऑडिटोरियम उभारले नाही तर प्रशासनाला मुंबईकरांच्या संतापाचा सामना करावा लागेल, असे भाजपचे अतुल शाह म्हणाले. यावेळी काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनीदेखील ऑडिटोरियम उभारण्याची मागणी लावून धरली. यावेळी सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी प्रशासनाला सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.

प्रशासन म्हणते…

गिरगाव येथे होणाऱया बहुउद्देशीय जेट्टीमुळे मुंबईत वाहतुकीचे आणखी एक साधन निर्माण होणार असल्याचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी सांगितले. या ठिकाणी अद्ययावत कलादालन होणार आहे. या कलादालनाचा संपूर्ण आराखडा तयार आहे. याबाबत 7 जुलै रोजी आयुक्त प्रवीण परदेशी यांना प्रेझेंटेशन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

सध्याची स्थिती

बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी असलेले ऑडिटोरियम गेल्या 19 वर्षांपासून बंद आहे. त्याची दुरुस्तीही करण्यात आली नाही. 2015 मध्ये हे ऑडिटोरियम तोडण्यात आले, मात्र अद्याप त्या ठिकाणी नव्याने काम सुरू करण्यात आलेले नाही. दरम्यान, पालिका प्रशासनाने या ठिकाणी नव्याने अद्ययावत कलादालन उभारणार असल्याचे सांगितले.