कर्नाडांची मराठी नाटकं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> क्षितिज झारापकर

पुण्यातील एका नाट्यमहोत्सवात गिरीश कर्नाड यांच्या शेवटच्या नाटकाचा प्रयोग आहे. हयवदन, नागमंडल, ययाती, कर्नाडांच्या अशा अनवट नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले आहे.

नाटय़ परिषदेचं शंभरावं नाट्य संमेलन येऊ घातलेलं असताना नगर येथे झालेल्या सत्तराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आठवले. हे अध्यक्ष कानडी होते. कलेला भाषेचं कुंपण नसतं हे सिद्ध करणारं ते संमेलन होतं. हे अध्यक्ष जरी स्वतःचं सगळं लिखाण कानडी भाषेत करत असले तरी जन्माने आणि संस्कारांनी ते मराठीच होते. त्यांचा जन्म 1938 साली माथेरानला झाला. या नाटककाराला नाटकाचं बाळकडू त्यांच्या आईकडून घरात बालगंधर्वांच्या नकलांमधून मिळालं आणि लिखाण कानडीत असलं तरी घरात सगळे आणि ते स्वतः उत्तम मराठी बोलत असत. हे श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे गिरीश कर्नाड.

गिरीश कर्नाड यांनी मराठी नाटय़सृष्टीत मानाचं स्थान प्राप्त केलं ते ‘ययाती’, ‘तुघलग’, ‘हयवदन’ आणि ‘नागमंडल’ या नाटकांतून. ही नाटकं कन्नड भाषेतून अनुवादित होती. कर्नाडांनी नाटक लिहिल्यावर प्रकरण तिथे संपत नसे. ‘ययाती’ मराठीत करताना त्यांनी नाटकाची सुधारित आवृत्ती अनुवादासाठी दिली होती. त्यांच्या ‘नागमंडल’ या नाटकाचे दोन भिन्न अंत त्यांनी लिहिले होते. कर्नाडांच्या लेखणीत पुराण कथांना नवीन मायने देण्यापासून ते आजच्या पिढीच्या अगदी मोबाईलच्या अतिरेकी वापरातून उद्भवणाऱया दुष्परिणामांपर्यंत सगळं पेलण्याचं सामर्थ्य होतं. म्हणूनच आपलं लिखाण अनुवादात हरवेल याचं भय कर्नाडांना कधीच वाटलं नाही. किंबहुना मराठीला ते कन्नडची मावस बहीण मानत आणि या अनुवादात काहीच हरवणार नाही याची त्यांना खात्री होती.

पहिल्या नाटकात ‘ययाती’मध्ये कर्नाड सांगतात की, कोणतंही बलिदान हे फक्त देण्याऱया आणि घेणाऱयापुरतं मर्यादित नसतं. त्याचे दूरगामी परिणाम भोवतालच्या सर्व गोष्टींवर होत असतात आणि त्या परिणामांचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा, तर ‘हयवदन’मध्ये पूर्ण पुरुष ही कधीच संभव नसलेली अतिशयोक्ती आहे आणि हे पूर्णत्व साधण्याच्या अट्टाहासात पूर्ण ऱहास संभवतो हे सांगितलं आहे. या दोन्ही नाटकांमध्ये पुराणकथांचा उपयोग कंटेम्पररी थिएटरमध्ये कर्नाडांनी चपखलपणे केलेला दिसतो. ‘नागमंडल’ पवित्रता आणि पतिव्रत्यावर प्रखर भाष्य करतं. इथे कर्नाड कथानकाच्या पुढे जाऊन आपल्याला प्रश्न विचारायला लावतात आणि त्यांची उत्तरं शोधायला भाग पाडतात. हे गिरीश कर्नाड या नाटककाराचं USP आहे. प्रत्येक वेळेस जे प्रचलित आहे, ज्ञात आहे ते तसं का आहे आणि जे आहे ते तसं योग्य आहे का, याचा ते आपल्याला विचार करायला लावतात. ‘तुघलग’मध्ये ते भूतकाळाचा वर्तमानाशी जोडून विचार करायला लावतात. आज जेव्हा संपूर्ण देश एका गोंडस कथानकाच्या प्रेमात पडलाय तेव्हा कर्नाडांची ही शिकवण की, कथानकानंतर खरे प्रश्न संभवतात आणि नाटककार तिसऱया अंकातच गोष्ट बदलतात आणि आधी न जाणवलेले मूलभूत प्रश्न उपस्थित होऊ शकतात हे फार महत्त्वाचं होतं.

कर्नाडांनी स्वतःच्या नाटकांवर कधीच मालकी हक्क नाही गाजवला. प्रत्येक प्रयोग हा पुनर्निर्माणाची अनुभूती देणारा असतो आणि म्हणून प्रत्येक सादरकर्त्याला त्याच्या पद्धतीने अनुभवून सादर करण्याचा हक्क गिरीश कर्नाडांना मान्य होता. या मुळेच त्यांची नाटकं इब्राहिम एल्कझी, विजया मेहता, एलिक पदमसी, सत्यदेव दुबे आणि दामू केंकरे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने करून दाखवली. नाटय़गृहातल्या प्रत्येकासाठी प्रयोगात काहीतरी असलंच पाहिजे हा कर्नाडांचा हट्ट असे. प्रयोगाचं यश हे प्रेक्षकांच्या रिऍक्शन आणि कौतुकावर अवलंबून असतं असं ते मानत. नाटक म्हणजे प्रेक्षक अणि सादरकर्ते यांच्यातला बंदिस्त संवाद आहे हे त्यांचं मत होतं. नाटककार असण्याचं शल्य हे आहे की, आपण जे लिहितो ते नेहमी दुसऱयांसाठी असतं असं ते म्हणत. 2007-2008 साली पॉप्युलर प्रकाशनाने कर्नाडांची दहा नाटकं मराठीत प्रकाशित केली. त्यात ‘अग्नी आणि पाऊस’ आणि ‘द वेडिंग अल्बम’ ही दोन नाटकंही आहेत. ‘अग्नी आणि पाऊस’ हे टिपू सुलतानची मनोगतं आहेत तर ‘द वेडिंग अल्बम’ हे इंटरनेट युगात घडणारी प्रेमकथा आहे. यावरून गिरीश कर्नाड यांचा कॅनव्हास किती विस्तीर्ण होता याची कल्पना येते.

काही महिन्यांपूर्वी ‘हम्पी’ नावाचा एक सुरेख मराठी चित्रपट आला होता. सध्या पुण्यातील एका महोत्सवात गिरीश कर्नाड यांच्या शेवटच्या नाटकाचा प्रयोग आहे. ‘क्रॉसिंग टू तलिकोटा’ हे नाटक 1565 साली हम्पीच्या विजयनगर साम्रज्याच्या अस्तावर बेतलेलं आहे. गिरीश कर्नाड आता यातून नवीन काय आपल्यासमोर ठेवतात ते पाहण्याची उत्सुकता आहे.

[email protected]