भंडारदऱ्याच्या भिंतीवरून पडून मुलीचा मृत्यू, सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करण्याच्या नादात गमावला जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारदरा धरणाच्या अजस्त्र भिंतीवर चढून मोबाईलमध्ये व्हिडीओ काढल्यानंतर तो सोशल मीडियावर शेअर करण्याच्या नादात शेंडी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील 11वीत शिकणाऱया विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. भंडारदरा धरणाच्या भिंतीवरून पडून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने धरणाची सुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचे दिसून येत आहे. उज्ज्वला बाळू वैराळ (वय 17, रा. वाकी, ता. अकोले) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

उज्ज्वला वैराळ ही शुक्रवारी आपल्या काही महाविद्यालयीन मैत्रिणींबरोबर कॉलेजपासून काही अंतरावरच असलेल्या भंडारदरा धरणाच्या भिंतीवर गेली होती. स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात सर्व मुली दंग होत्या. धरणाच्या दक्षिणेकडील बाजूच्या भिंतीतून 50 फूट उंचीवर आवर्तनात नदीपात्रात पाणी सोडण्याची यंत्रणा आहे. धरणाच्या भिंतीतील या आऊटलेट वॉल्व्हपासून 50 फूट उंचीवर भिंत बांधकाम आहे. या भिंतीच्या कडेला दगडी बांधकामाच्या सुरक्षा वॉलवर चढून उज्ज्वलाने व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला.

दरम्यान, तिच्यासोबत आलेल्या अन्य मैत्रिणी पुन्हा महाविद्यालयात गेल्या. आपल्याबरोबर आलेली उज्ज्वला आपल्यासोबत माघारी महाविद्यालयात आली नसल्याबद्दल कोणीच बोलले नसल्याने कोणालाच संशय आला नाही. प्रत्येक शुक्रवारी शेंडीत आठवडी बाजार भरतो. या भिंतावरून आठवडी बाजारासाठी जाणाऱया एका महिलेच्या निदर्शनास भिंतीवर बेवारस स्थितीत महाविद्यालयात नेण्यात येणारी सॅक व तेथेच एक ओळखपत्र आढळून आले. त्यामुळे या महिलेने संशयावरून धरणाच्या भिंतीवरून आऊटलेट वॉल्व्हच्या बाजूने तळाकडे डोकावून पाहिले असता, एक मुलगी खाली पडली असल्याचे दिसून आले. या महिलेने तत्काळ ही माहिती धरणावरील पोलीस सुरक्षारक्षकांना दिली. राजूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेऊन ही माहिती वरिष्ठांच्या कानावर घातली.

उज्ज्वलाचे वडील बाळू वैराळ हे बांधकाम व्यावसायिक असून, ते याच भागात लहान-मोठी बांधकामाची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. उज्ज्वलाला मोठी बहीण व लहान भाऊ आहे.

पोलिसांकडून पंचनामा करून मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल देवीदास भडकवाड, कॉन्स्टेबल दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे तपास करीत आहेत.

धरणाच्या सुरक्षा यंत्रणेची लक्तरे वेशीवर

भंडारदरा धरणाच्या ढिसाळ सुरक्षा यंत्रणेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. वारंवार घडणाऱया अशा दुर्घटनांना टाळण्यासाठी कठोर व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. लाखो रुपये खर्चून धरण परिसरातून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तीन-चार वर्षांपासून नादुरुस्त झाल्याने कायमस्वरुपी बंद आहेत.