कामावर जात असलेल्या तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामावर जात असलेल्या तरुणीचा भरदिवसा विनयभंग करणाऱयाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अमरचंद्र कोले असे त्याचे नाव असून त्याला आज अंधेरी येथील न्यायालयात हजर केले होते.

पीडित तरुणी ही अंधेरी पूर्व परिसरात राहत असून एका खासगी ठिकाणी काम करते. रविवारी सकाळी ती जेव्हीएलआरच्या महाकाली येथील स्काय वॉक येथून कामाला जात होती. तेव्हा मागून आलेल्या अमरचंद्रने तरुणीला पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रस्त्याने जाणाऱया एका दक्ष नागरिकाने पाहिला. त्याने तरुणीची अमरचंद्रच्या तावडीतून सुटका केली.  तरुणीने धावत जाऊन तिच्या वडिलांना बोलावून आणले. त्यानंतर तरुणीने याची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अमरचंद्रला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अमरचंद्र विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अमरचंद्र हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून तो अंधेरी पूर्व येथे काम करतो. त्याने या पूर्वी असे काही कृत्य केले आहेत का याचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.