लग्नाला नकार दिल्याने तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीरसबंध ठेवत लग्नाला नकार दिल्याने पीडित तरूणीने फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित तरूणीची व तरूणाची दीड वर्षापूर्वा मैत्री झाली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आणि भेटीगाठीतून त्यांच्यात प्रेम झाले. जून 2020 मध्ये तरूणी कामावरून घरी येत असताना तरूणाने तिला थांबवले. तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत आपण पाठवलेले सर्व मेसेज डिलिट करून टाक, मी तुझी टाईमपास करण्यासाठी निवड केली होती. माझे तुझ्यावर खरे प्रेम करत नसल्याचे सांगितले.

हा प्रकार तरूणीने भावाला व वडिलांना सांगितला. त्यानंतर 27 नोव्हेंबरला बुरोंडी भंडारवाडा येथे संशयित दिनेश सुनिल इंदुलकर याच्या व पीडितेच्या समाजातील बैठक झाली. त्यात दिनेशने पिडीतेशी लग्न करायचे आहे की नाही ते चार दिवसात सांगायचे ठरले. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये दिनेश पिडीतेसोबत लग्न करणार नसल्याचे सांगण्यात आले.

या गोष्टीचा धसका घेत पीडितेने नैराश्याच्या भरात सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरातील फिनेल प्राशन केले. तिला उपचारासाठी दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दिनेश इंदुलकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ करीत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या