मुलींना शाळेत मिळणार संरक्षणाचे धडे, अभ्यासक्रमात समावेश करण्याचा राज्य सरकारचा विचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील मुलींना आता शाळेतच स्वसंरक्षणाचे धडे मिळणार आहेत. एखाद्या ठिकाणी मुलींची छेड काढली गेल्यास किंवा त्यांच्यावर हल्ला झाल्यास त्याचा प्रभावीपणे सामना करता यावा म्हणून शैक्षणिक अभ्यासक्रमातच स्वसंरक्षणाच्या धडय़ांचा समावेश करण्याचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱया नेहा श्रीमल या पुणे येथील महिलेने ऑनलाइन याचिका दाखल करत मुलींना शाळेतच सक्तीने स्वसंरक्षणाचे धडे देण्याची मागणी करत सह्यांची मोहीम राबवली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 1 लाख 38 हजार लोकांनी या मोहिमेत भाग घेत आपला पाठिंबा दिला आहे. त्याची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दखल घेतली. एक तास खेळाच्या शिक्षणांतर्गत स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येतील.

नेहमीच मदतीसाठी पोलिसांकडे पाहणे योग्य नाही
कोणी मुलींची छेडछाड काढली किंवा त्यांच्यावर हल्ला केला की आपण लगेचच पोलिसांकडून काय मदत मिळेल का हे पाहतो. पण सर्वत्र मदतीसाठी पोलिसांकडे पाहणे योग्य नाही, ते नेहमीच उपलब्ध असतील असे नाही. त्यामुळे कोणाच्या मदतीची वाट न पाहता तरुणींनी स्वतःच स्वतःचे संरक्षण करणे योग्य असल्याचे मत नेहा श्रीमल यांनी व्यक्त केले आहे.