बंडखोरांना केंद्राची सुरक्षा देण्याऐवजी कश्मिरी पंडितांना सुरक्षा द्या – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या राज्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांना खायला अन्न मिळत नाही अशा ठिकाणी स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणारे बंडखोर आमदार जाऊन मजा मारत आहेत. या बंडखोर आमदारांना केंद्रातून सुरक्षा मिळत आहे. खरंतर केंद्राने आसाम मधील पूरग्रस्तांना मदत द्यायला हवी होती. केंद्रातून कश्मिरी पंडितांना सुरक्षा द्यायला हवी होती. असा घणाघात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रविवारी कालीन येथे आयोजित मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला.

यावेळी ते म्हणाले की या आमदारांचं दररोजचं खाण्या पिण्याचं बिल 8 ते 9 लाखांवर जातं. तर मग इतर खर्च किती असेल. ही सर्व परिस्थिती संपूर्ण देश बघत आहे. येत्या काळात आपल्या राज्यात आणि देशात जगभरातून लोकं येणार आहेत. तेव्हा त्यांना या देशात लोकशाही शिल्लक आहे का असा प्रश्न पडेल. केंद्रातील सत्ताधारी पक्षाने एका राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार पळवून नेले ही लाजिरवाणी गोष्ट आहे. बंडखोरांना जो संदेश पोहोचायचा आहे तो पोहोचलेला आहे. सामान्य शिवसैनिक माझ्या सोबत असल्याने मला आनंद होत आहे. पर्यावरण मंत्री असल्यानं माझे काम हेच आहे की महाराष्ट्रात कुठेही घाण साचू नये. ती घाण आपल्यातून गेलेली आहे याचा मला आनंद आहे. ही अशी फुटीरवादी लोकं आपल्याला हवीत कशाला?

20 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं, आणि तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं आहे का? असं विचारलं होतं. परंतु त्यावेळी त्यांनी निरनिराळी कारणे देत नाटक केले. परंतु त्यानंतरही 20 जूनला जे व्हायचं होतं ते झालंच. असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. त्यांच्या सोबत गेलेल्यांपैकी 15 ते 16 आमदार आमच्या संपर्कात आहेत. कारण त्यांना तिथे फरफटत नेलं आहे. परंतु या बंडखोरांना महाराष्ट्र माफ करणार नाही. असे ते म्हणाले.

बंडखोरांचे जे व्हिडिओ फिरत आहेत. त्यात त्यांची काय अवस्था झाली आहे हे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं खातं शिंदेंना दिलं. कोणताच मुख्यमंत्री नगरविकास खातं आपल्या हातातून सोडत नाही. एमएसआरडीसीचं खातं सात वर्षे त्यांच्याकडे होतं. तसेच पक्षात देखील त्यांचं वजन होतं. जो मान सन्मान त्यांना शिवसेनेत मिळत होता तो तिथे मिळणार नाही. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मी दावोस येथे जाऊन राज्यासाठी काही महत्वाचे करार करून आलो आहे. मी स्वतःसाठी हे करार केले नाहीत. आजही ज्यांना जायचं आहे आणि ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. पण जे विकले गेले आहेत त्यांना शिवसेनेची आणि महाराष्ट्राची दारं बंद आहेत. आणि जे आजही मनाने आपल्यासोबत आहेत त्यांना आजही दारं खुली असल्याचे ते म्हणाले.

आमदारांना सुरतहून गुवाहाटीला अक्षरशः फरफटत नेण्यात आलं. माझ्या मनात सारखा हाच विचार येतो की आपण यांच्यासाठी नक्की काय कमी केलं. सामान्य माणसाला असामान्य ओळख देणारी शिवसेना आहे. कुणी टपरी चालवायचा तर कुणी रिक्षा चालवायचा, परंतु शिवसेनेने अशांना मोठं केलं. हीच शिवसेनेची ओळख आहे. आपण कोणामुळे इतके मोठे झालो आणि आपल्याला कोणामुळे सगळं मिळालं हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना स्वतःला आरशात बघायला लाज वाटेल. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर केली.

राज्यसभेच्या निवडणुकीत संजय पवार यांना पडायचं काम याच फुटीरवादी आमदारांनी केलं आहे. विधान परिषदेला नंदुरबार येथील आमश्या पाडवी यांच्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली. कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सर्वांवर लक्ष असते. अनेक जण सांगतात की तुम्ही या आमदारांवर अंधविश्वास ठेवलात परंतु अंधविश्वास हा शिवसैनिकांवर नाही ठेवायचा मग कोणावर ठेवायचा. असे ते म्हणाले.

बंड करायचंच आहे तर हिम्मत दाखवून करा. अशा लाजिरवाण्याप्रकारे बंड काय करताय. बंड हे सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी होत असतात. परंतु आता या आमदारांनी सत्ताधारी पक्षातून बंड केलेलं आहे. मात्र आता ते परत इथे येऊ शकत नाही याची आम्ही कायदेशीर प्रक्रिया करत आहोत. याआधी देखील काहींनी बंड केले आहेत. परंतु त्यांची उंची कमीच होत चालली आहे. बंडखोर आमदारांचे आकडे कितीही असुद्या परंतु विजय शिवसेनेचाच होणार. कारण उद्धव ठाकरेंनी मोह सोडला आहे, जिद्द आणि ताकद नाही. विकाऊ लोकांनी पक्ष सोडला आहे मात्र शिवसैनिकांनी पक्ष सोडला नाही. शिवसैनिक म्हणून आपण एकत्र काम करत राहिलो तर आपण लोकांच्या मनात कायम सत्ताधारी म्हणून राहू असे ते म्हणाले.

आम्हीच शिवसेना, आमचाच धनुष्यबाण आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे बंडखोर आमदार म्हणत आहेत. परंतु असं म्हणण्याची तुमची लायकी असती तर तुम्ही बंद करायला सुरतला गेला नासतात. तुमच्यावर बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे संस्कार असते तर तुम्ही समोर येऊन मुख्यमंत्रीपद मागितलं असतं. महाराष्ट्रात बंड करायची हिम्मत नाही म्हणूनच ते सुरतला पळाले अशी टीका ठाकरे यांनी शिंदेंवर केली.