
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉम्ब स्फोटातील आरोपी असणाऱ्या व्यक्तीला तिकीट देणे राजकीय पक्षाला शोभत नाही आणि हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा 20 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना पवार यांनी नाव न घेता, खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर तसेच भाजपवर निशाणा साधला.
शरद पवार आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, आयुष्यभर आपण ज्या विचारधारेला विरोध केला, त्या विचारधारेचे लोक सध्या सत्तेत आले आहेत. समाजात फूट पाडण्याची विषारी विचारधारा असणारा वर्ग संसदेत मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. लवकरच अधिवेशनाला सुरुवात होईल. अधिवेशनात राष्ट्रपतींच्या संबोधनासाठी जमा होणाऱ्या सदस्यांमध्ये भगवी विचारधारा मानणारी लोकं मोठ्या प्रमाणात असतील. यातील काहींवर खटलेही दाखल आहेत. यात गंभीर खटले असलेली एक व्यक्ती मध्य प्रदेशमधून निवडून आली. मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला असो किंवा आणखी काही गंभीर खटले असणाऱ्यांना तिकीट देणे राजकीय पक्ष आणि लोकशाहीला शोभत नाही’, असे म्हणत शरद पवार यांनी भोपाळमधून निवडून आलेल्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावाचा उल्लेख न करता भाजपवर टीका केली.
पवार पुढे म्हणाले, ‘खटले हे दोन प्रकारचे असतात. महागाईच्या विरोधात मोर्चा काढला की तुमच्यावर सत्ताधारी पक्षाकडून खटला दाखल होतो. तर हे खटले गंभीर नाही. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दाखल झालेला हा खटला आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला या खटल्याचा अभिमान असतो. परंतु बॉम्ब स्फोटातील आरोपीला तिकीट देणे म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे’, असे पवार म्हणाले.
Giving tickets to bomb blast accused an attack on democracy: Sharad Pawar
Read @ANI Story | https://t.co/hMAYtuMqRH pic.twitter.com/mEf5OA4PB2
— ANI Digital (@ani_digital) June 10, 2019
























































