
टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतात एक क्रांतिकारी पर्व सुरू होणार असून लवकरच शारजात ग्लोबल टेनिस क्रिकेट लीग (जीटीसीएल) चे भव्य आयोजन केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. ही लीग विशेषतः 60 चेंडूंच्या फॉरमॅटमध्ये खेळली जाणार असून यामध्ये जगभरातील आठ आंतरराष्ट्रीय संघ एकमेकांशी भिडतील. या दिमाखदार स्पर्धेची घोषणा हिंदुस्थानचा क्रिकेटपटू पीयूष चावला, सिनेस्टार सोहेल खान, अभिनेता विंदू दारा सिंग, संगीतकार साजिद आणि क्रिकेटपटू इक्बाल अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत करण्यात आली.या लीगसाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. सुरुवातीला ओपन रजिस्ट्रेशन होईल, त्यानंतर हिंदुस्थानात आणि परदेशात 30 शहरांमध्ये निवड चाचण्या (ट्रायल्स) घेतल्या जातील. त्यातून निवडलेले खेळाडू पुढे ड्राफ्ट प्रक्रियेत सहभागी केले जातील. यातून फ्रेंचायझी आपापले अंतिम संघ निवडतील, अशी माहिती जीटीसीएलचे संस्थापक अमीन पठाण यांनी दिली.




























































