नोकऱ्या देण्यासाठी विद्यार्थ्यांवर परीक्षांचा बोजा लादू नका!

12

सामना ऑनलाईन, मुंबई

आयआयटी मुंबईतील पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतानाच अनेक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात. पण त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 120 तासांच्या परीक्षांमधून जावे लागते. इतका वेळ मुलाखती आणि परीक्षांमध्ये जात असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास आणि संशोधनाला वेळ अपुरा पडतो. त्यामुळे नोकऱ्या देण्यासाठी विद्यार्थ्यांवर असा परीक्षांचा बोजा लादू नका, असे पत्रच आयआयटी मुंबईतील प्राध्यापकाने आयटी कंपन्यांना दिले आहे.

कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड इंजिनीयरिंग विभागातील प्राध्यापकाने हे पत्र पाठवले आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये आयआयटी मुंबईत कॅम्पस प्लेसमेंटला सुरुवात होते. जगभरातील नामांकित कंपन्या त्यात सहभागी होतात. या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या मुलाखती आणि आवश्यक परीक्षा घेतल्यानंतरच त्यांची निवड केली जाते. अगदी टॉपर्स विद्यार्थ्यांनाही या परीक्षांमधून जावे लागते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर परीक्षेतील निकालांवर होत आहे असे या पत्रात नमूद आहे.

कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड इंजिनीयरिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आधीच खूप अभ्यास असतो. त्यामुळे प्लेसमेंटमध्येही त्यांच्यावर परीक्षा लादल्या गेल्या तर त्या ताणाचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर होऊ शकतो, अशी शक्यता या पत्रात वर्तवण्यात आली आहे. प्लेसमेंट सेलकडून विद्यार्थ्यांना या परीक्षांना कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे. पण तरीही प्लेसमेंटमधील परीक्षांसाठी लागणारा वेळ पाहिला तर तो जास्तच आहे, असे एका माजी विद्यार्थ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या