पोलिसांनी सरकारच्या हातचे बाहुले बनू नये, मुख्यमंत्र्यांना अटक करुन धमक दाखवा; काँग्रेसचे आव्हान

6528

काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांना केवळ मास्क न वापरल्याचे कारण सांगुन अटक करणाऱ्या पोलिसांनी, दाबोळी ग्रेड सेपरेटर तसेच इतर अनेक ठिकाणी मास्क न वापरता व व्यक्तिगत अंतर न पाळता कोरोना मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व इतराना अटक करण्याची धमक दाखवावी असे आव्हान काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिले आहे.

चोडणकर म्हणाले, मंत्री बाबू कवळेकर व निलेश काब्राल यानी कुडचडे व केपे येथे कोविड सेंटर सुरू करण्यास विरोध केला होता. परंतु त्या दोघांवर सरकारने कारवाई केलेली नाही. जर संकल्प आमोणकरांना अटक करणे बेकायदेशीर असेल तर सदर कृती करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे व त्यानी जर चुक केली असेल तर मुख़्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वीज मंत्र्यांनीही चूक केली आहे तर त्यांनाही अमोणकरा प्रमाणे अटक करुन कायदा सगळ्यांना सारखा हे जनतेला दाखवुन द्या, असे चोडणकर म्हणाले. पणजी येथे पोलीस मुख्यालयात काँग्रेसचा शिष्टमंडळा बरोबर जाऊन त्यांनी पोलीस महानिरिक्षकांकडे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यानी केलेल्या उल्लंघनाचे पुरावे दिले व तक्रार दाखल केली.

गोव्यातील भाजपची दादागीरी दिवसेंदिवस वाढत आहे. न्याय मागण्यांसाठी जाब विचारणाऱ्याना सरकार छळत आहे तसेच परिस्थीतीनुसार बारीक गोष्टींचे उल्लंघन करणारे मोटारसायकल पायलट व सामान्य लोकांना तालांव देऊन सरकार आपली तिजोरी भरत आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला. पोलिस प्रमुखांनी आम्हाला पुढील दोन -तीन दिवसांत कारवाई करण्याचे वचन दिले असुन, त्यानी शब्द न पाळल्यास आम्ही आंदोलन तिव्र करणार आहोत व त्याची संपुर्ण जबाबदारी सरकारवर राहणार आहे, असा इशारा चोडणकर यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या