देश-विदेश – गोवा जळीतकांड प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी आणखी एका आरोपीला दिल्लीहून अटक करण्यात आली आहे. या जळीतकांड प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. भरत कोहली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोहलीवर नाईट क्लबमधील दैनंदिन देखरेखीची जबाबदारी होती. आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी त्याला दिल्लीहून गोव्याला आणले. गोव्यातील बिर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सर्वाधिक क्लबचे सदस्य होते.

ऑस्ट्रियात उंच पर्वतावर थंडीने गारठून महिलेचा मृत्यू

ऑस्ट्रियातील सर्वात उंच पर्वत ग्रॉसग्लॉकनरवर पोहोचलेल्या एका 33 वर्षीय महिलेचा थंडीने गारठून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्स्टिन गर्टनर असे या महिलेचे नाव असून ती साल्झबर्गची रहिवासी होती. सोशल मीडियावर ती ‘विंटर चाइल्ड’ आणि ‘माउंटन पर्सन’ म्हणून प्रसिद्ध होती. कर्स्टिन ही प्रियकर थॉमस प्लामबेर्गरसोबत गेली होती. वर पोहोचल्यानंतर तेथील हवामान खराब झाले. त्यामुळे ती थकली आणि तिचे शरीर थंड पडले. थॉमसने बचाव पथकाला याची माहिती दिली नाही. त्यामुळे थॉमसवर आता गंभीर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे.

युद्धबंदीनंतरही थायलंडचा कंबोडियावर हवाई हल्ला

थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धबंदी करण्यात आली होती. परंतु अवघ्या दोन महिन्यांत थायलंडने कंबोडियावर हवाई हल्ला केला आहे. थायलंडने दिलेल्या माहितीनुसार, कंबोडिया अनेक दिवसांपासून सीमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रे जमा करत होता आणि सैन्याला नवीन ठिकाणी तैनात करत होता. याच कारणामुळे त्यांना हवाई हल्ला करावा लागला. काही महिन्यांपूर्वीही दोघांमध्ये पाच दिवस लढाई चालली होती, ज्यात अनेक लोक मारले गेले होते आणि लाखो लोक सुरक्षित ठिकाणी निघून गेले होते.

रॉटवायलर डॉगने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

कर्नाटकातील दावणगेरे परिसरात दोन रॉटवायलर डॉगने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कुत्र्याच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शैलेश कुमार असे असून त्याच्याकडे तीन रॉटवायलर डॉग आहेत. त्या डॉगची नावे ब्रॅडो, पप्पी आणि हिरो अशी आहेत. पप्पी आणि हिरो या दोन कुत्र्यांना मालकाने मोकाट सोडल्याने या कुत्र्याने अनीता नावाच्या महिलेवर हल्ला केला आणि चावा घेतला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला.

माजी पंतप्रधान खालिदा जियांवर लंडनमध्ये उपचार

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी लंडनला घेऊन जाणार आहेत. यासाठी कतारहून एक एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्यात आली असून ही एअर अॅम्ब्युलन्स उद्या मंगळवारी ढाक्यात पोहोचणार आहे. ही अॅम्ब्युलन्स कतार सरकारने उपलब्ध केली आहे. या अॅम्ब्युलन्समध्ये व्हेंटिलेटर, मॉनिटर, इन्फ्यूजन पंप आणि ऑक्सिजन सिस्टमचा समावेश आहे. खालिदा जिया या सध्या 80 वर्षांच्या असून त्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)च्या अध्यक्षा आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर बांगलादेशात उपचार सुरू आहेत.