
गोवा शालांत मंडळाच्या दहावी परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाने गोव्यातील भाजप सरकारच्या कारकिर्दीत राज्यातील बेरोजगारी, शैक्षणीक क्षेत्राचा खालावलेला दर्जा व वाढता भ्रष्टाचार याचे ओंघळवाणे प्रतिबींब समोर आले आहे. भाजपने बेगडी देशप्रेमाच्या नावाने राजकारण न करता स्वत: शिक्षण, अर्थव्यवस्था व नितीमत्ता यांवर आत्मपरीक्षण करावे, अशी टिका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
पणजीकर म्हणाले, विद्यादानाचे कार्य करणारा प्रत्येक शिक्षक हा प्रामाणिक असलाच पाहिजे व त्यांने विद्यार्थ्यांना आयुष्यात सचोटी, जिद्द व चिकाटीच्या बळावर पुढे जाण्याचा धडा देणे हे त्याचे कर्तव्य असते. ‘सत्य नेहमी कटू असते’ या म्हणी प्रमाणे सदर प्रश्नप्रत्रिकेतील प्रश्नाने भाजपला राजकीय अडचण निर्माण झाल्याने त्यांनी सदर विषयास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.
सन 2012 पासुन गोव्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले असल्याचा आरोप करून पणजीकर म्हणाले, राज्यात आर्थिक आणिबाणी त्यामुळेच निर्माण झाली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा खालावला आहे. वाढत्या भ्रष्टाचाराने प्रशासनाची आज वाट लागली आहे. सरकारने वेळीच आत्मपरिक्षण न केल्यास भावी पिढी भाजपला कदापी माफ करणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. गोव्यातील भाजप सरकारची सन 2012 पासुनची चुकीची धोरणे तसेच केवळ आपल्या सग्यासोयऱ्यांना संधी देणे व आपल्या कार्यकर्त्याना सरकारी तिजोरी लुटण्यासाठी मोकळीक देणे यामुळे गोव्यातील युवकांना त्यांच्या इच्छे विरूद्ध परदेशात नोकरी करुन पोट भरावे लागले आहे.
पोर्तुगीज पासपोर्ट बनवुन नोकरीसाठी आपल्या घरच्यांपासुन हजारो किलोमीटर दूर रोजी-रोटी कमावणारे तसेच विदेशी चलन मिळवुन गोव्याच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावणाऱ्यांना देशद्रोही वा पोर्तुगीज धार्जिणे संबोधणे हे दुर्देवी आहे. भाजप सरकारने गोव्यातील खाण व पर्यावरण उद्योगांचा खून केला आहे,असा आरोप पणजीकर यांनी केला.
गोवा शालांत मंडळाने या एकंदर प्रकरणांत, नियमांना धरुनच पुढील निर्णय घेणे महत्वाचे आहे, अशी मागणी करून पणजीकर म्हणाले, राजकीय दबावाला बळी पडुन कोणताही निर्णय घेणे वा कारवाई करणे आत्मघाती ठरेल याची शालांत मंडळाने नोंद घ्यावी. गोव्यातील भाजपने शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच राजकारण केले आहे. आगामी जिल्हा पंचायत निवडणूकांवर डोळा ठेवुन त्यांनी कोरोना संकट काळात शालांत मंडळाला दहावीच्या परीक्षा घेण्यास भाग पाडले हे मंत्री माॅविन गुदिन्होंच्या वक्तव्याने उघड झाले आहे, असा आरोप देखील पणजीकर यांनी केला.



























































