पाणी टंचाई सुरू असल्याने काँग्रेसची शहां यांना मिनरल वॉटर देण्याची तयारी

गेले सात दिवस पाण्याशिवाय काढल्या नंतर लोकांचा संताप पाहुन विरोधी पक्ष आता जागे होऊ लागले आहेत. आम आदमी पक्षाने पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या घरा समोर निदर्शने केली तर पाणी न मिळत नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी गोवा दौ-यावर येत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या देण्याची तयारी चालवली आहे.

शहा हे पश्चिम विभागीय मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी गोव्यात गुरुवारी येत आहेत. या बैठकीला गोव्यासह गुजरात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच दमण दीव आणि दादरा नगरहवेलीचे प्रशासक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उपहासात्मकपणे ट्विट करत ‘ गेले सात दिवस राजधानी शहरातील नळ कोरडे पडले आहेत. अमित शहा ज्या हॉटेलमध्ये उतरतील तेथेही नळ कोरडे असतील, तेव्हा त्यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या देण्याची आमची तयारी आहे.’ गुरुवार पासून राजधानी शहरासह तिसवाडी तालुका तसेच फोंडा तालुक्याला पाणी पुरवठा झालेला नाही. सरकारचे हे अपयश असल्याची टीका चोडणकर यांनी करतानाच या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार देखील केला आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या कार्यकत्र्यानी रिकाम्या बादल्या घेऊन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानाबाहेर निदर्शने
केली.

खांडेपार- फोंडा येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम बुधवारी सव्वा अकरा वाजता पूर्ण झाले. लोखंडी जलवाहिनीच्या तुकडयांना वेल्डिंग करणे आणि बाजूला सिमेंटचे बांधकाम करणे अशी प्रक्रिया सकाळी अकरानंतर पूर्ण झाली. त्यानंतर कमी दाबाने थोडे पाणी सोडून जलवाहिनीची तपासणी करण्यात आली.रात्री उशिरा हे पाणी पणजीच्या जवळपास पोचले असून उद्या सकाळ पासून मर्यादित स्वरुपात पाणी पुरवठा सुरु केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या