राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कृत्य घटना विरोधी, काँग्रेसचा आरोप

निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांना दात विरहित गोवा लोकायुक्त पदाची शपथ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देऊन गोव्याचे अर्धवेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटना विरोधी कृत्य केले असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथे केला. पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, उत्तर गोवा युवक कॉँग्रेस अध्यक्ष विवेक डिसिल्व्हा, युवक काँग्रेस सरचिटणीस अर्चित नाईक आणि म्हापसा युवक काँग्रेस अध्यक्ष हिमांशू तीवरेकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रात कंगना राणावत सारख्या नटीला भेटायला वेळ आहे. पण गोव्यातील घटनात्मक पदाच्या शपथविधीला उपस्थित राहायला मात्र वेळ नाही. या घटनेचा दुसरा अर्थ असा आहे की, हा विधी इतर कार्यक्रमांसारखाच उरकायचा असून त्याला काहीही महत्त्व नसल्याचे राज्यपालांनी दाखवून दिले असल्याचे चोडणकर म्हणाले

चोडणकर यांनी दावा केला की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खरे तर आता गोव्यात येण्याची गरज आहे. गोव्यात कोविड परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. कोशारी यांच्या आधीचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कार्यक्षम राज्यपाल कसा असतो हे दाखवून देऊन गोव्यातील जनतेला दिलासा दिला होता. दुर्दैवाने गोव्यातील लोक दुःखात असतांना सध्याच्या अर्धवेळ राज्यपालांना त्याचे काहीही पडून गेलेले नाही.

2014 ला देशात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने प्रत्येक घटनात्मक आणि लोकशाही वादी संस्था यांच्यावर बुलडोझर फिरावायला सुरुवात केली आहे. म्हणूनच त्यांनी राज भवनाचे रूपांतर कार्यक्रमस्थळात केले आहे. याला केवळ सत्यपाल मलिक हेच अपवाद ठरले. सरकार चुकीचे ठरले तेव्हा त्यांनी ते उघड पणे सांगण्याचे धाडस केले.

भगतसिंह कोश्यारी सारखे लोक आपली घटनात्मक जबाबदारी विसरून केवळ पदामुळे मिळणारे लाभ पदरात पाडून घेत आहेत. लोकशाही मुल्य आणि लोक भावना याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. पुन्हा एकदा आमचे मागणे हे आहे की नवे लोकायुक्त हे गोवेकरांना न्याय देण्यासाठी आले आहेत की सुट्टी घालवण्यासाठी आले आहेत याचा खुलासा करावा. कमकुवत आणि दात विरहित लोकायुक्त न्यायदान कसे करू शकतील हेही त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहन चोडणकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या