मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर जागेचे शुद्धीकरण, गोवा कला अकादमीची चौकशी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च रोजी निधन झाले. त्यांचे पार्थिव गोव्यातील कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्या जागेचे शनिवारी शुद्धीकरण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वच स्तरांत टीकेची झोड उठल्यानंतर सरकारने आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी शुद्धीकरणाच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गौड यांनी सांगितले की, “ही बाब गंभीर असून सरकारी वास्तूत अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणार नाही.” सांस्कृतिक सचिव गुरुदास पिलरनेरकर यांनी पंडितांना फक्त मंत्रोच्चारासाठी बोलावले होते असा खुलासा केला आहे. अकादमीच्या कर्मचार्‍यांनी चार पंडितांना फक्त ‘ओम्’चा मंत्रोच्चार करण्यासाठी निमंत्रित केले होते. पंडितांनी जे केले ते शुद्धीकरण नव्हते, फक्त ‘ओम्’ मंत्रपठण होते.

पर्रीकरांना भारतरत्न मिळावा, गोवा सरकार करणार शिफारस

मनोहर पर्रीकर यांना भारतरत्न हा देशातील सर्वेच्च नागरी पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. याबाबत अजून अधिकृत निर्णय घेतलेला नाही. पण अनौपचारिक चर्चा सुरू आहे. पर्रीकर हे फक्त गोव्याचेच नव्हे तर देशाचे संरक्षण मंत्री म्हणूनही मोठे नेते होते. त्यामुळे या सन्मानासाठी ते योग्य उमेदवार आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी म्हटले आहे. भाजपचे सहकारी पक्ष या निर्णयाला समर्थन देतील, असा विश्वास सरकारला आहे. भाजपचा सहकारी पक्ष मगोपाने यापूर्वीच दक्षिण गोव्यातील नव्याने बांधण्यात येत असलेल्या ज्युरी ब्रिजला पर्रीकरांचे नाव देण्याची मागणी केली आहे. बांधकाम मंत्री आणि मगोपाचे प्रमुख सुदीप ढवळीकर यांनी नवीन पुलाच्या दोन्ही स्तंभावर पर्रीकरांचे छायाचित्र असेल, अशी घोषणा केली आहे.