
गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहरात पिण्याच्या पाण्याचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यामध्ये तुफान पाऊस झाला. या पावसामुळे गोव्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. तरीही ही परिस्थिती का ओढावली असेल असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
गोव्यातील केरये-खांडेपार येथे एक भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने त्याखाली असलेली पणजीला पाणीपुरवठा करणाऱी मुख्य वाहिनी फुटली. याचा फटका राजधानी पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्यालाही बसला.प्यायला पाणीच नसल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न इतका गंभीर बनला की तिथले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना स्वत: यात लक्ष घालावे लागले.
पाणी पुरवठा खंडीत झाल्याचा फटका गोवा मेडिकल कॉलेजला देखील बसला आहे. मात्र टँकरने पाणी पुरवठा करून तेथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे सर्वसामान्य लोकांचे मात्र प्रचंड हाल झाले आहेत. पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी टँकरने पाणी पुरवठा करून लोकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र टँकरची संख्या कमी आणि मागणी जास्त यामुळे पणजीत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.





























































