गोव्यात ओला, उबेरच्या धर्तीवर सरकारी गोवामाइल्स अॅप टॅक्सी सेवा सुरु 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी 

गोव्यात पहिल्यांदाच मोबाइल अॅपवर आधारित टॅक्सी सेवेचे अर्थात गोवा माइल्सचे लाँचिंग  मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आज पर्वरी येथील सचिवालयात करण्यात आले.

यावेळी पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) अध्यक्ष,  निलेश काब्राल,  मुख्य सचिव  धर्मेद्र शर्मा, पर्यटन सचिव,  शेओ प्रताप सिंग,  मेनिनो डिसूझा, संचालक आदि मान्यवर उपस्थित होते. गोवा माइल्सची सेवा स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांसाठी महत्वाची ठरणार आहे. गोवा व आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन- प्रवासात या सेवेमुळे क्रांतीकारी बदल होतील अशी अपेक्षा बाळगली जात आहे. तसेच या नव्या उपक्रमांतर्गत सेवा देणाऱ्या टॅक्सी चालकांचा फायदा होईल असा दावा पर्यटन खात्याने केला आहे. राज्यात प्रवेश केल्यानंतर लगेचच गोवामाइल्सद्वारे परवडणाऱ्या आणि सरकारने मंजूर केलेल्या दरांत टॅक्सी आरक्षित करता येणार आहे. गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल स्टोअरद्वारे गोवामाइल्स अॅप डाउनलोड करता येणार आहे.

लाँचिंग नंतर बोलताना पर्रीकर म्हणाले, ‘‘या नव्या अॅप आधारित टॅक्सी सेवेमुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना परवडणाऱ्या दरात भरपूर प्रवास करण्याची संधी देता येईल. विशेष म्हणजे, त्यांना गोव्यात आल्यापासून परत जाईपर्यंत परवडणाऱ्या दरांत ही सेवा वापरता येईल. हा उपक्रम सुरु केल्याबद्दल मी गोवा टुरिझमचे अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला भरपूर यश मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो.’’पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटनची सुविधा!

अॅपवर आधारित टॅक्सी सेवेच्या लाँचमुळे पर्यटकांना गोवामाइल्स सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारे आहे हे सहज लक्षात येईल, कारण त्यांना केवळ एका मोबाइल अॅपद्वारे आरक्षण, देखरेख आणि पैसे भरणे अशा सर्व क्रिया करत येणार आहेत. ट्रॅकिंगसुद्धा अतिशय सोपे ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्यांची राइड त्यांच्या सद्य आणि त्यापूर्वी आरक्षित केलेल्या राइडचे ट्रॅकिंग पाहाता येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेस काही धोका असल्यास त्यात पॅनिक बटनाची सोयही दिलेली आहे.

चालकांसाठी पाळावयाच्या काही सूचना जीटीडीसीने तयार केल्या असून पुढे त्यासंदर्भात प्रत्यक्ष आणि डिजिटल पातळीवर तपासणी करण्याचे काम जीटीडीसी करेल. पालन न करणाऱ्यांना ताकीद दिली जाणार असून त्यामुळे ग्राहक समाधानाचा चांगला दर्जा राखला जाईल.