माझा न्यायदेवतेवरचा विश्वास उडाला! बलात्कारी सुटले… बिल्किस बानो सुन्न झाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील गोध्रा दंगलीदरम्यान घडलेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केल्यानंतर देशभरातून नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. बिल्किस बानो यासुद्धा या निर्णयामुळे सुन्न झाल्या आहेत. ‘‘माझ्यावर अत्याचार करणारे सुटले. माझ्या सात कुटुंबीयांची हत्या करणारे सुटले. त्यांची जन्मठेपेची शिक्षा शिथिल करून त्यांना सोडले गेले’’, असे खिन्नपणे सांगतानाच ‘‘माझा न्यायदेवतेवरचा विश्वास उडाला’’, अशी प्रतिक्रिया बिल्किस बानो यांनी दिली आहे.

‘या निर्णयावर काय बोलणार? शब्दच सुचत नव्हते. मी अजूनही सुन्न आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास होता. त्या घटनेचा धक्का पचवून मी पुन्हा जगू लागले होते, परंतु दोषींच्या सुटकेने माझी शांतता हिरावून घेतली. न्यायावरील माझा विश्वास डळमळीत झाला. न्यायासाठी झगडणाऱया प्रत्येक महिलेला अशाने न्याय मिळेल का? दोषींच्या मुक्ततेनंतर गुजरात सरकारने माझ्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी द्यावी,’ असे बिल्किस बानो यांनी म्हटले आहे.

बिल्किस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱयांची सुटका रद्द करण्याची मागणी करणारे एक निवेदन प्रसिद्ध झाले आहे. देशातील मानवाधिकार कार्यकर्ते, इतिहासतज्ञ, उच्चस्तरीय अधिकारी आणि प्रतिष्ठत व्यक्तींना उद्देशून हे निवेदन आहे. स्वातंत्र्यदिनीच देशातील महिलांचे बलात्कारी आणि हत्या करणाऱयांची सुटका होताना पहावे लागले हे अत्यंत लाजिरवाणे आहे. बलात्कार आणि खूनप्रकरणी दोषी असलेल्यांची शिक्षा माफ करणे हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. केंद्र सरकारने राज्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचेही त्यामुळे उल्लंघन झाले आहे.’ असे या निवेदनात म्हटले आहे.

आतापर्यंत सुमारे सहा हजार लोकांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, मानवाधिकार, इतिहास, कला, साहित्य, चित्रपट आदी विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी काम करणाऱया विविध संघटनांनीही बिल्किस बानो यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. दाहोद जिह्यातील लिमखेडा तालुक्यातील रणधीरपूर गावात बिल्किस यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यावेळी त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. दंगलखोरांनी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीसह सात कुटुंबीयांची हत्या केली होती.

बिल्किसवर बलात्कार करणारे संस्कारी ब्राह्मण, भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान
बिल्किसच्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले व नुकतेच सुटका झालेले 11 जण हे संस्कारी ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मण हे चांगले वर्तन करणारे म्हणून ओळखले जातात, असे वादग्रस्त विधान गोध्राचे भाजप आमदार सी. के. राऊलजी यांनी केले आहे. या दोषींना पुष्पहार घालून मिठाई भरवून त्यांचे स्वागत करणाऱयांनाही राऊलजी यांनी पाठिंबा दिला आहे. राऊलजी हे गुजरात सरकारच्या पॅनेलमधील दोन भाजप नेत्यांपैकी एक होते, ज्यांनी एकमताने या बलात्काऱयांना सोडण्याचा निर्णय घेतला.