
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडमधील सुवर्णकाळाचा साक्षिदार असलेला राज कपूर यांच्या मालकीचा आर के स्टुडिओ गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतला आहे. या स्टुडिओतून अनेक कलाकारांचे भवितव्य घडले आहे. अशा हा स्टुडिओ आता पाडण्यात येणार असून त्याजागी गोदरेज प्रॉपर्टीजकडून आलिशान इमारती बांधण्यात येणार आहेत.
आर.के. स्टुडिओ हा चेंबूरमध्ये तब्बल 2.2 एकर परिसरात उभारण्यात आलेला आहे. शोमॅन राज कपूर यांनी हा स्टुडिओ बनवला होता. या स्टुडीओत त्यांनी आर.के. बॅनरअंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली. ‘आग’, ‘बरसात’, ‘आवारा’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘श्री 420’, ‘मेरा नाम जोकर’ या सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे शुटिंग या स्टुडिओमध्ये करण्यात आले. तसेच ऋषि कपूर आणि डिंपल कापडिया यांची डेब्यू फिल्म ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’ यासारखे चित्रपट देखील येथेच बनवण्यात आले होते. 1988 मध्ये राज कपूर यांचे निधन झाल्यानंतर या स्टुडिओची सूत्रं त्यांच्या कुटुंबीयांकडे आली. गेल्या वर्षी आग लागल्यानंतर या स्टुडिओची रया गेली. यानंतर कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता.

























































