पाण्यापासून सोने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

प्राचीन काळी विविध धातू आणि रसायने यांच्या मिश्रणापासून सोने बनवण्याचे अनेक प्रयत्न केले जात असत. या अल्केमी प्रक्रियेचे कोडे काही प्रमाणात सोडवत झेक प्रजासत्ताकच्या प्रागमधील ‘झेक अॅपॅडमी ऑफ सायन्सेस’च्या संशोधकांनी पाण्याचे सोन्यात रूपांतर करण्यात यश मिळवले आहे.

दिवाळी आणि सोने यांचे एक वेगळेच नाते आहे. दिवाळीच्या काळात सोन्याला विशेष झळाळी येते. सध्या सोन्याचे भाव सतत वर खाली होत असल्याने, ते चर्चेत आहे. आता सोने पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. संशोधकांनी चक्क पाण्यापासून सोन्याची निर्मिती करून सर्वांनाच थक्क करून सोडले आहे. झेक प्रजासत्ताकच्या प्रागमधील ‘झेक अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या संशोधकांनी हा पराक्रम करून दाखवला आहे.

प्राचीन काळी विविध धातू आणि रसायने यांच्या मिश्रणापासून सोने बनवण्याचे अनेक प्रयत्न केले जात असत. या प्रक्रियेला ‘अल्केमी’ किंवा ‘रस विधा’ असे म्हटले जात असे. आपण साध्या सोप्या शब्दात याला ‘किमयागारी’ असे म्हणतो. प्राचीन काळातील याच किमयागारीचे कोडे काही प्रमाणात सोडवत, संशोधकांनी पाण्याचे सोन्यात रूपांतर करण्यात यश मिळवले आहे.

अल्कधर्मी (क्षारीय) धातू हे सोडियम किंवा पोटॅशियम अशा अत्यंत प्रतिक्रियाशील अशा घटकांचा बनलेला एक समूह असतो. पाण्याच्या संपर्कात येताच हे समूह अत्यंत स्पह्टक बनतात. यासाठी संशोधकांनी एक खास प्रयोग केला, ज्याच्या मदतीने या पदार्थांची स्फोटकता अत्यंत कमी करून, त्यांचा विस्फोट होणार नाही याची काळजी घेण्यात आली. त्यानंतर एका सिरींजमध्ये सोडियम आणि पोटॅशियम भरण्यात आले; जे सामान्य तापमानात द्रवरूपात असतात. यानंतर या सिरींजला एका निर्वात जागेवर ठेवण्यात आले. सिरींजच्या मदतीने संशोधकांनी या मिश्रणाच्या प्रत्येक थेंबाला कमी प्रमाणात पाण्याची वाफ देण्यात आली. या प्रक्रियेमुळे मायक्रोमीटरच्या दहाव्या भागाइतका एक जाड थर तयार झाला. या थरात त्यातील इलेक्ट्रॉन हे धातूंच्या आयनसह पाण्यात पटकन विरघळून गेले आणि काही सेकंदात हा थर चक्क सोन्याचा बनला. यासाठी कुठल्याही प्रकारच्या उच्च दाबाची आवश्यकता लागली नाही.

अत्यंत मौल्यवान अशा या धातूबद्दल जाता जाता आठवलेली एक गंमत… शास्त्रज्ञांच्या मते आपल्या खडकात, भूगर्भात सापडणारे हे सोने, मूळचे पृथ्वीचे रहिवासी नाहीच आहे. उल्कावर्षावाच्या माध्यमातून हे सोने पृथ्वी आणि चंद्रावर पोचले आहे. पृथ्वीच्या मुख्य भागाची जडण घडण झाल्यानंतर त्या भागावर उल्का येऊन आदळल्या. या उल्कांमध्ये बऱयाच प्रमाणात सोने हा धातू होता, जो या वर्षावामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागात मिसळला. ही घटना साधारण 3.8 अब्ज वर्षापूर्वीची असावी. त्यामुळे भल्याभल्यांना मोहात पाडणारा हा सोनेरी धातू पृथ्वीच्या मालकीचा नाही हे कायम लक्षात ठेवा.

[email protected]