
आखाती युद्धामुळे जागतिक अनिश्चितता निर्माण झाल्याने सोने-चांदीच्या किमतीने आधीच उसळी घेतली होती. परिणामी सोने-चांदी ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले होते. अशातच पंतप्रधानांनी वर्षभर सोने खरेदी न करण्याचा दिलेला सल्ला आणि त्यापाठोपाठ 15 टक्क्यांपर्यंत नेलेले आयात शुल्क, यामुळे सराफा व्यवसाय संकटात आहे. ग्राहकांनी सोने-चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. दुकानात शुकशुकाट दिसत आहे. लाखो कारागिरांवर रिकाम्या हाती बसण्याची वेळ आली आहे. सोनेविक्री 90 टक्के ठप्प झाली.
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाख 63 हजारांच्या तर 22 कॅरेटचा दर 1 लाख 50 हजारांच्या आसपास राहिला. तर चांदी प्रति किलो 2 लाख 90 हजार रुपये राहिली. गेल्या अनेक महिन्यांपासून सोने-चांदीचे दर चढे आहेत. अशातच सरकारने परकीय चलनावरील ताण कमी करण्यासाठी आयात शुल्क 6 टक्क्यांवरून 15 टक्के केले आहे. याचा थेट फटका ग्राहकांनाच बसणार आहे. वाढत्या दरामुळे आधीच सोने खरेदी 50 टक्के घसरली होती. त्यात आता आयात शुल्क वाढीची भर पडली आहे. सोने खरेदी 85 ते 90 टक्क्यांपर्यंत घसरली आहे.
झवेरी बाजाराची चमक फिकी
ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने झवेरी बाजारातील सोने विक्री 10 टक्क्यांवर आली आहे. याआधी दिवसाला 200 कोटी रुपयांची उलाढाल बाजारात व्हायची. मात्र आता खूप मोठा फटका इथल्या व्यावसायिकांना बसला आहे, अशी खंत इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवत्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली.
हिंदुस्थानात सर्वाधिक सोने आयात
देशात खरेदी केल्या जाणाऱ्या एकूण सोन्यापैकी जवळपास 75 टक्के सोने दागिन्यांच्या स्वरूपात असते. याशिवाय लोक गोल्ड कॉइन आणि गोल्ड बारमध्येही गुंतवणूक करतात. केरळ आणि तामीळनाडू ही राज्ये सोन्याच्या खरेदीत आघाडीवर मानली जातात. हिंदुस्थानात दररोज सुमारे 2,200 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले करतात. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, देशात दररोज सरासरी 2,200 किलो सोन्याची खरेदी केली जाते. देशाला जवळपास 99 टक्के सोने परदेशातून आयात करावे लागते. हिंदुस्थान सर्वाधिक सोने स्वित्झर्लंडमधून आयात करतो. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका आणि पेरू या देशांकडूनही सोन्याची आयात केली जाते.
उरलासुरला धंदा ठप्प… लाखो कारागिरांचे काय?
सोने उद्योगात एकटय़ा मुंबईत 3 ते 4 लाख मोठे कारागीर आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे असे सगळे मिळून सहा लाखांच्या वर कारागीर आहेत. एकटय़ा झवेरी बाजारात सुमारे 50 हजार कारागीर आहेत. या आधीच दरवाढीने मागणी घटल्याने हजारो कारागीर आपल्या गावाला निघून गेले आहेत. आता तर पंतप्रधानांचे आवाहन आणि आयात शुल्क वाढीने उरलेसुरले मार्पेटही ठप्प झालेय. उरलेल्या कारागिरांना हाती काम राहिले नाही, अशी खंत गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन, महाराष्ट्रचे खजिनदार दीपक देवरुखकर यांनी व्यक्त केली.
































































