उरणच्या आर्यनचा सुवर्ण वेध: वर्ल्ड फिल्ड आर्चरी-२०१८ स्पर्धेत हिंदुस्थानचा झेंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उरण

इंटरनॅशनल फिल्ड आर्चरी असोशिएशन आयोजित नुकत्याच दक्षिण आफ्रिकामध्ये पार पडलेल्या वर्ल्ड फिल्ड आर्चरी-२०१८ स्पर्धेत अंडर १९ वयोगटात उरणच्या आर्यन पाटील यांने गोल्ड मेडल पटकाविले आहे. १६ वर्ष ९ महिने वय असलेल्या आर्यनने केलेल्या दैदित्यमान आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामगिरीमुळे देशाचे नाव सातासमुद्रापलिकडे पोहचविल्याने त्यांच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

उरण तालुक्यातील जसखार गावातील आर्यन पाटील सध्या १२ वी सायन्सचा विद्यार्थी आहे. नवी मुंबई-खारघर येथील इंटरनॅशनल स्टुडंट स्कुलमध्ये आर्यन सध्या शिक्षण घेत आहे. आर्चरीचे वेड जडलेल्या आर्यनने मागील पाच वर्षांपासून सराव आणि मेहनतीच्या जोरावर जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या दर्जेदार खेळाचा ठसा उमटविला आहे. सिंगल स्पॉट,फाईव्ह स्पॉट,मिक्स स्पॉट आदी विविध स्पर्धामध्ये त्यांनी अनेक मेडल पटकावली आहेत. जिल्हास्तरीय विविध स्पर्धात १० गोल्ड मेडल जिंकली आहेत. २०१५ मध्ये पॉडेचरीमध्ये आयोजित नॅशनल चॅम्पीयन स्पर्धेत ६५० स्पधर्कांमध्ये आर्यनने चमकदार कामगिरी करीत गोल्ड मेडल जिंकले होते. त्याआधी त्यांने मुंबई मेयर स्पर्धेत विविध गटातून ५ सिल्वरची कमाई केली आहे. सोलापुर,कोल्हापुर येथे २०१४ मध्ये राज्यस्तरीत आर्चरी स्पर्धेतही आर्यनने गोल्डची कमाई केली आहे. मुंबई येथे २०१६मध्ये आयोजित स्पर्धेतही आर्यनही विविध गटातून ५ सिल्वर मेडल पटकाविली आहेत. जिल्हा,राज्य आणि नॅशनल स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये गोल्ड, सिल्वर मेडल्सची लयलुट करणार्‍या आर्यनची आस्ट्रेलियातील वॉगा-वॉगा येथे सप्टेंबर २०१६ दरम्यान वर्ल्ड फिल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पधेसाठी निवड झाली होती. साता समुद्रापार आयोजित स्पर्धेत त्यावेळी १८ देशातील ५५० स्पर्धक सहभागी झाले होते. कुमार गटासाठी आयोजित या स्पर्धेसाठी हिंदुस्थानातुन आर्यन पाटील (उरण) १८ देशातील ५५०स्पर्धकांमध्ये पंधरा वर्षाच्या आर्यनने चौथ्या क्रमांकावर झेप घेत आपल्या खेळाची चुणूक दाखविली होती.

नुकतीच साऊथ आफ्रिकेतील एलग्रो रिव्हरपोचेफस्ट्रॉम येथे इंटरनॅशनल फिल्ड आर्चरी असोशिएशनने वर्ल्ड फिल्ड आर्चरी-२०१८स्पर्धा आयोजित केली होती. जगातील ५५ देशातील ४७५ स्पर्धक या स्पर्धेत उतरले होते.६ ते १४ ऑक्टोंबर २०१८ दरम्यान आयोजित स्पर्धेत अंडर- १९ वयेागटातून १७ वर्षाहून कमी वयाचा आर्यनही स्पर्धेत सहभागी झाला होता.या स्पर्धेत आर्यनने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर थेट सुवर्ण पदकावरच आपले नाव कोरले.आर्यनच्या या यशाबद्दल सागंताना त्याचे प्रशिक्षक आणि फिल्ड आर्चरी ऑफ इंडिया असेाशिएशनचे सेक्रेटरी सुभाषचंद्र नायर यांनी आर्यनच्या या यशात आणि त्याला सातत्याने प्रोत्साहन देणारे त्याचे आई-वडील प्रशांत पाटील, आजोबा पी.जे.पाटील आणि त्याचे कुंटुंबिय,मित्रमंडळी आणि सहकार्‍यांचाही सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.तसेच दक्षिण आफ्रिकेत ३८ ते ४० डिग्री टेंपरेचरमध्ये सुमारे ११० किलो वजन असतानाही आर्यनने सलग पाच दिवस 9 किमी चालण्याचा व्यायाम केला.अंग मेहनत,कसुन केलेला सराव आणि जिद्दीच्या जोरावर आर्यन कंपाऊंड बो अनलिमिटेड फ्री स्टाईल या गटात सुवर्ण पदाचा मानकरी ठरला. इंटरनॅशनल फिल्ड अर्चरी असोशिएशनच्या जनरल सेक्रेटरी मिसेस मारीयाटीजी प्लेअर यांच्या हस्ते आर्यनला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. सुवर्ण पदक पटकाविल्यानंतर जगातील आर्चरी स्पर्धक आणि स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या हजारो क्रीडा चाहत्यांनी स्टॅण्डींग ऑडीशन देत आर्यनचे तोंडभरुन कौतुक केले असल्याचे प्रशिक्षक सुभाष नायर यांनी सांगितले. आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे आर्यनचे स्वप्न आहे. या स्वप्नपुर्तीसाठी विविध आयोजित स्पर्धामध्ये सहभागी होऊन सातत्याने कामगिरी उंचावत ठेवण्याचे काम आर्यन बरोबरच त्याच्या प्रशिक्षकांनाही करावे लागणार आहे. सध्या तरी साता समुद्रापार जाऊन देशाचे नाव उज्वल करणार्‍या आर्यनवर असंख्य चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.