पॅरिस ऑलिम्पिकचे सूप वाजले आता पॅरालिम्पिक स्पर्धेचे नगारे वाजायला लागलेत. 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पॅरिसमध्येच ही पॅरालिम्पिक स्पर्धा होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वीच हिंदुस्थानला एक मोठा धक्का बसलाय. टोकियो पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक जिंकणारा हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू प्रमोद भगतवर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने निलंबनाची कारवाई केली आहे.
प्रमोद भगतने डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 18 महिन्यांसाठी त्याला निलंबित करण्यात आल्याची घोषणा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) केली आहे. त्यामुळे पदकाचा प्रबळ दावेदार असलेला हा हिंदुस्थानी खेळाडू पॅरिस पॅरालिम्पिकला मुकणार आहे. प्रमोद भगत वर्षभरात तीनवेळा स्वतःचा ठावठिकाणा सांगू शकला नाही. याप्रकरणी दोषी आढळल्याने त्याच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादच्या (सीएएस) डोपिंगाविरोधी विभागाला भगत 12 महिन्यांत तीन वेळा ठावठिकाणा सांगू न शकल्याने ‘बीडब्ल्यू्एफ’ अॅण्टी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. प्रमोद भगतने या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र सीएएस अपील विभागाने निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आता प्रमोद भगत पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.