सोन्याची घौडदौड सुरूच, चांदीत मोठी घसरण; आगामी काळात दरात अस्थिरतेची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त

दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात सोने प्रति १० ग्रॅम १.३० लाख रुपयांच्या वर विकले जात आहे. या वर्षात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. तसेच दसऱ्यानंतर सोन्याचे भाव रॉकेटप्रमाणे वधारले आहेत. सोन्याला मागे टाकत चांदीनेही दोन दिवसात 10 हजाराची झेप घेतली होती. आता आगामी काळात सोन्या-चांदी्च्या दरात अस्थिरता राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट होऊ शकते. अलिकडच्या काळात झालेली विक्रमी वाढ अजूनही सुरूच आहे. दिवाळीच्या सणांनंतर सोन्याच्या धातूच्या मागणीत घट होऊ शकते. जागतिक घडामोडी, जागतिक अर्थव्यवस्था आणि देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याने नवीन उच्चांक गाठल्यानंतर, गुंतवणूकदार अमेरिकन वित्त विधेयक, प्रमुख जागतिक डेटा आणि फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या टिप्पण्यांवर लक्ष ठेवत असल्याने सोने-चांदीत मोठी वाढ किंवा घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सण संपल्यानंतर बाजारपेठेतील सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार सध्या जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवत आहेत. चीनचा व्यापारी डेटा, यूके महागाई, विविध क्षेत्रांसाठी पीएमआय डेटा, यूएस ग्राहक विश्वास डेटा आणि फेडरल रिझर्व्हच्या घोषणेसह अनेक घडामोडींता सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

देशातील उत्सवी मागणी आणि मजबूत ईटीएफ खरेदीमुळे गेल्या आठवड्यात सोने सकारात्मक पातळीवर बंद झाले. गेल्या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या वायद्यांमध्ये ५,६४४ किंवा ४.६५ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे जागितक धोरणात्मक अनिश्चितता, अमेरिकन कर आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मंदी यामुळे २०२५ पर्यंत ही तेजी कायम राहण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

MCX वर डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याच्या वायद्यांचा दर शुक्रवारी प्रति १० ग्रॅम १,३२,२९४ या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. तथापि, ते मागील उच्चांकावरून त्यात घसरण होत प्रति १० ग्रॅम १,२७,००८ वर बंद झाले. चांदीच्या दरातही शुक्रवारी घसरण होत त्यात सुमारे 5 हजाराची घट झाली. सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली. तर चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे.