Gold-Silver rate- आठवड्याभरात सोने 2500, तर चांदी 10 हजारांनी झाली स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

सोने आणि चांदीचे भाव सातत्याने उतरत आहेत. गेल्या आठवड्याभरात सोने 2 हजार 500 रुपयांनी, तर चांदी 10 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर दोन महिन्यात सोन्याचा दर 6 हजार 500 रुपयांनी, तर चांदीचा दर 18 हजार 500 रुपयांनी कमी झाला आहे. बाजारात निराशेचे वातावरण असल्याने आणि कमोडिटी मार्केटमध्ये मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे दर पडत आहेत.

शुक्रवारीही सोन्याचा दर 0.8 टक्के पडला आणि प्रति 10 ग्राम (1 तोळा) सोन्याचा दर 49 हजार 486 रुपये झाला. तर चांदीचा दर 2.4 टक्के खाली आला आणि 1 किलो चांदीचा दर 58 हजार 214 रुपये झाला. गुरुवारीही सोने 30 रुपयांनी, तर चांदी 1 हजार 60 रुपयांनी स्वस्त झाली होती.

ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. सोने 56 हजार 200 प्रति तोळा तर चांदी 74 हजार रुपये प्रति किलो झाली होती. मात्र दीड महिन्यातच सोने जवळपास 6 हजार 500 रुपये, तर चांदी 18 हजार 500 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा दर गटांगळ्या खात आहे. 2 हजार डॉलरवर गेलेले सोने आता 1 हजार 864.47 डॉलर प्रति औस झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आठवड्याभारत 4 टक्के स्वस्त झालं आहे. तर चांदी 22.95 डॉलर प्रति औस झाले आहे.

सण-वारात उलाढाल होण्याचा अंदाज
कोरोना काळात थंडावलेला सराफा बाजार येत्या सण-वाराच्या काळात गजबजून जाण्याची शक्यता आहे. मागणी वाढल्यास सोने-चांदीच्या किंमतीत थोडीफार चढ-उतार होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या