सोन्या-चांदीच्या दराची घोडदौड सुरूच; सोने 1,41,000 तर चांदी 2,65,000 वर पोहचली

वाढती जागतिक अशांतता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँड ताब्यात घेण्याची आणि टॅरिफ वाढवण्याची धमकी यामुळे जगाची चिंता वाढली आहे. या घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढउतार दिसत आहेत. गेल्या आठड्यातही सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ झाली होती. मात्र, शुक्रवारी बाजार बंद होताना दोन्ही धातूंमध्ये तेजी दिसून आली होती. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून सोने 1,41,000 तर चांदी 2,65,000 वर पोहचली आहे.

गेल्या वर्षी दिवाळीनंतर सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरांनी गगनाला गवसणी घातली आहे. २०२६ सालाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतींनी आकाशाला भिडल्या आहेत. वायदे बाजारात म्हणजे (मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX) वर सोमवारी सोने आणि चांदी दोन्ही रेकॉर्डब्रेक तेजीने व्यवहार करत आहेत. चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. येणाऱ्या काळात चांदीचे भाव नवीन विक्रमाची नोंद करतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या भावात तेजी कायम आहे. सकाळी सोन्याचा भाव ९६१ रुपये वाढून १,३८,७०३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर दुपारी सोन्याच्या दरात 2,700 रुपयांची वाढ होत ते 1,41, तर 529 वर पोहचले होते. तर चांदीच्या दरात 12,374 रुपयांची वाढ होत ते 2,65,001 वर व्यवहार करत होते.वायदे बाजारात चांदीच्या किमतीत सुमारे ३.७१ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत इतकी मोठी वाढ झाल्यानंतर आता ती जुने रेकॉर्डजवळ पोहोचली आहे. बाजारात सध्या चांदीची मागणी खूप जास्त आहे आणि पुरवठा कमी असल्यामुळे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्या-चांदीचे दर नवे विक्रम प्रस्थापित करू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.