
सध्या सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. दर आवाक्याबाहेर गेल्याने ऐन लग्नसराईमध्ये दागिने करताना कसरत करावी लागत आहे. विशेष करून गेल्या महिन्याभरात सोने-चांदीचे दर रॉकेट झाले असून यामुळे सराफा बाजारातही सन्नाटा पसरला आहे. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही अनिश्चितचा निर्माण झाली असून याचा थेट फटका मध्यवर्गीयांच्या खिशाला बसत आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या उलथापालथीमुळे गेल्या महिन्याभरात सोने-चांदीचे दर प्रचंड वाढले असून दरवाढीची आकडेवारी डोळे चक्रावून टाकणारी आहे. केवळ एका महिन्यात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 29 हजार रुपयांनी वधारले आहेत, तर चांदीच्या दराने तर सर्व विक्रम मोडीत काढले असून त्यात प्रति किलो 1 लाख 32 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
24 डिसेंबर 2025 ला सोने 1 लाख 33 हजार प्रति तोळा होते, तर 24 जानेवारी 2026 ला हाच दर 1 लाख 62 हजारांपर्यंत पोहोचला होता. तर दुसरीकडे 24 डिसेंबर 2025 ला चांदी 1 लाख 98 हजार प्रति किलो होती, तर 24 जानेवारी 2026 ला हाच दर 3 लाख 30 हजारांवर पोहोचल्याचे दिसले.
दरम्यान, सोने-चांदीचे दर गगनाला भिडल्याने सराफा दुकानांतून ग्राहक गायब झाले आहेत. गुंतवणूकदारही आता पैसे लावताना दहावेळा विचार करत आहेत. या दरवाढीचा सर्वाधिक फटका कारागिरांना बसत आहे. काम नसल्याने त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, जर हीच परिस्थिती कायम राहिली तर अनेक छोट्या सराफा व्यावसायिकांना आपल्या दुकानांना टाळे लावावे लागतील.
दरवाढीची कारणे काय?
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला आहे. याचा परिणाम जगभरात दिसत आहे.
- युरोपशी संबंधित व्यापार विवादांमुळे निर्माण बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
- चांदीचा जागतिक पुरवठा कमी होणे आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढलेली मागणी यामुळे चांदीचे दरही वाढत आहेत.
- जागतिक परिस्थिती पाहता सोन्या-चांदीचे दर अजूनही वाढण्याची शक्यता आहे.
























































