लग्नघरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी, नेवासा तालुक्यातील घटना

लग्नघरातून चोरटय़ांनीं 23 तोळे दागिन्यांसह आठ लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नेवासा तालुक्यातील कुकाणा गावात घडली आहे. याप्रकरणी श्यामसुंदर धोंडीराम खेसे यांनी नेवासा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

श्यामसुंदर खेसे हे कुकाणा येथील जेऊरहैबती मार्गालगत राहतात. ते पाटबंधारे विभागात नोकरीला आहेत. त्यांच्या मुलाचे रविवारी लग्न असल्याने वराचे अनेक नातेवाइक खेसे यांच्याकडे मुक्कामी होते. खोसे घरात नातेवाईकांसह झोपलेले असताना, तीन चोरटय़ांनी घराच्या समोरचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व घरातील खोसे कुटुंबीयांसह त्यांच्या नातेवाईकांचेही सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.

खेसे यांच्या मुलीला पहाटे जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खेसे यांच्या घरी चोरी करण्यापूर्वी चोरटय़ांनी लगतच्या ललित भंडारी यांचे गेट उघडण्याचा प्रयत्न केला होता. भंडारी यांच्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. त्यावरूनच तिघे चोरटे असल्याचे दिसत आहेत. याप्रकरणी खेसे यांनी नेवासा पोलिसांत फिर्याद दिली आहे. नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या