Video – गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा पाच दिवसांनी पुढे ढकलल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेला मागील  सोमवारी सुरुवात झाली. मात्र परीक्षेदरम्यान सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्याने सकाळी 9 वाजताचा पेपर रद्द करत दुपारी 2 वाजता ठेवण्यात आला. तरीही तांत्रिक अडचण दूर न झाल्याने पेपरच रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली. आता सर्वच परिक्षा पाच दिवस पुढे ढकलण्यात आल्या. 12 ऑक्टोबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सुरू होणाऱ्या परीक्षा अडचणींविना पार पाडण्याचे आव्हान विद्यापीठासमोर आहे.

कोरोना महामारीमुळे राज्यात पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा पॅटर्न राबविण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या विविध 105 अभ्यासक्रमांसाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील 212 महाविद्यालयांचे 18 हजार 500 विद्यार्थी परिक्षा देत आहेत. विद्यार्थ्याना ग्रुप ऑनलाईन परिक्षा द्यायची होती, तर अकरा ठिकाणी ऑफलाईन सेंटर सुरु करण्यात आले होते. सोमवारी सकाळी नऊ ते सव्वा दहाच्या दरम्यान पहिला पेपर होता. मात्र पहिल्या ऑनलाईन पेपरलाच अनेक ठिकाणी इंटरनेटमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. अनेक विद्यार्थ्याना लॉगिन करता आले नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी इंटरनेट सेवेचा मोठा अभाव आहे. येथे भारत दूरसंचार निगमव्यतिरिक्त इतर कोणत्याही खाजगी कंपन्यांची इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही. त्यामुळे दुर्गम भागातील काही ठिकाणी विद्यार्थ्यासाठी वायफायची सुविधा देण्यात आली. विद्यार्थी तिथे सकाळपासून येऊन बसले होते. जवळपास 8 हजार 892 विद्यार्थ्यांचे लॉगिन झाले. या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविले. मात्र काही विद्यार्थ्याचे लॉगिन न झाल्याने परिक्षा देता आली नाही. आता सर्व अभ्यासक्रमाच्या परिक्षा येत्या 12 ऑक्टोबरपासून ठरवलेल्या पध्दतीनेच होतील, असे विद्यापीठाने जाहीर केले. नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र यावेळी तरी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडावी, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.