कुंभमेळा आता गुगल मॅपवर

>>स्पायडरमॅन

2019 च्या कुंभमेळय़ाचे क्षेत्रफळ हे नेहमीपेक्षा थोडे मोठे असणार आहे. अंदाजे ते 3500 हेक्टरमध्ये फुलणार आहे. यावेळी तब्बल 15 करोड भाविक या मेळय़ाला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही संख्या जगभरातील 60 देशांच्या लोकसंख्येच्या बरोबरीची आहे हे नवल. यावेळी कुंभमेळय़ासाठी प्रयागराजला येणारे भाविक कुठल्याही अडचणीला सामोरे जाऊ नयेत यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी करण्यास सुरुवात केली आहे. 2019 साली यासाठी कुंभमेळय़ाची पूर्ण माहिती, इथले रस्ते, महत्त्वाची ठिकाणी गुगल मॅपवरती आणले जाणार आहेत. ज्यामुळे भाविक रस्ता चुकण्यापासून तर वाचणारच आहेत, पण त्यांना इतरही सेवा मिळवताना कोणती अडचण येणार नाही. यासाठी गुगलच्या सौजन्याने गुगल मॅप्सवरती कुंभमेळय़ाची पूर्ण माहिती सविस्तर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी एक खास सॉफ्टवेअर बनवण्यात येते आहे. या सॉफ्टवेअरमध्ये कुंभमेळय़ासंदर्भात सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल. यासंदर्भात एसओई अर्थात हिंदुस्थान सर्वेक्षण टीमने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने या सर्व भागाचा एक सर्व्हेदेखील नुकताच केला आहे. गुगलच्या मदतीसाठी या संपूर्ण कुंभ क्षेत्राची थ्रीडी प्रिंट आणि टुडी जीआयएस डेटाबेस तयार केला जाणार आहे. हे सर्व नोव्हेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर संपूर्ण अलाहाबाद शहराची ब्ल्यू प्रिंट डिसेंबरपर्यंत तयार केली जाईल. त्यानंतर गुगल मॅप्सच्या मदतीने हा सर्व डेटा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे ग्राहकांना कुंभमेळय़ात कुठेही भेट देणे अत्यंत सुलभ होणार आहे. ड्रोनने केलेल्या थ्रीडी मॅपिंग सर्व्हेमुळे संपूर्ण कुंभमेळय़ातच भाविकांना कुठल्याही क्षेत्राला भेट देणे, हॉस्पिटल अथवा कोणत्याही शिबिरापर्यंत पोचणे सुलभ होणार आहे. त्या जोडीलाच सार्वजनिक सेवा, रस्त्यावरची वाहतूक, गर्दी, इतर सरकारी सेवा या सर्वांची माहितीदेखील एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे.