कॅन्सर संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कमल रणदिवे यांना गुगलची मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील सेल्स बायोलॉजिस्ट डॉ. कमल रणदिवे यांची 104 वी जयंती आहे. यानिमित्ताने गुगलने आज डुडल साकारून कमल रणदिवे यांना मानवंदना दिली. त्यांनी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील संशोधनात महत्त्वाचे योगदान दिले होते. यासाठी त्यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले होते.

गुगलच्या आजच्या डूडलमध्ये एक महिला प्रयोगशाळेत संशोधन करताना दिसत आहे. ही लॅबमध्ये दिसणारी महिला म्हणजे डॉ. कमल रणदिवे आहेत. डॉ. रणदिवे यांचा जन्म हा 8 नोव्हेंबर 1917 रोजी पुण्यात झाला. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेतले. कृषी महाविद्यालयांतून एमएस्सी केले. पुढे सेल सायन्स, सेलच्या अभ्यासात त्यांनी पीएचडीही मिळवली. कमल रणदिवे यांनी कॅन्सरवर मोठय़ा प्रमाणात संशोधन केले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि अनुवांशिकतेचा परस्पर संबंध असलेल्या संशोधनापासूनच. कॅन्सरमध्ये संशोधन करताना ब्रेस्ट कॅन्सर आणि अनुवांशिकतेचा एकमेकांशी संबंध असल्याचा संशोधन करणारी पहिली व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. पुढे अनेकांनी त्यांच्या संशोधनाला दुजोरा दिला.

 कमल रणदिवे या हिंदुस्थानी महिला वैज्ञानिक संघाच्या संस्थापक सदस्या होत्या. त्यांनी मुंबईत टाटा मेमोरियलसाठी काम केले होते. निवृत्तीनंतर ग्रामीण भागातील आरोग्य सेविकांना प्रशिक्षण दिले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.