
डिलिव्हरी बॉईजच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. श्रम मंत्रालयाने अत्यंत कमी वेळेत म्हणजेच 10 मिनिटांत डिलिव्हरी करण्याच्या सुविधेवर आता बंदी घातली आहे. डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला असलेला धोका आणि रस्त्यावरील सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील महत्वाच्या ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्या जसे की स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आहे.
या बैठकीदरम्यान केंद्र सरकारने स्पष्ट केले की, डिलिव्हरीसाठी असलेल्या वेळेचे निर्बंध आता शिथिल केले आहेत. 10 मिनिटांच्या डिलिव्हरीमुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक दडपण येते आणि त्यातून रस्ते अपघातांचा धोका वाढतो, हे मुख्य कारण या निर्णयामागे आहे. सरकारच्या या भूमिकेनंतर संबंधित कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आपल्या ब्रँडच्या जाहिराती आणि सोशल मीडियावरून 10 मिनिटांच्या डिलिव्हरीचा दावा हटवण्याचे आश्वासन दिले. सरकारच्या या निर्देशानंतर ब्लिंकिटने तत्काळ पावले उचलत त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून 10 मिनिटांची डिलिव्हरी सुविधा अधिकृतपणे काढून टाकली आहे.





























































