
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे, मोकळया जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम 5 नोव्हेंबरपासून नियमांचे पालन करत सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे दशावतार, भजन, कीर्तन यासारख्या लोककला सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुडाळ- मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन याबाबतची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आहे.
आमदार वैभव नाईक यांनी सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. कार्तिक पौर्णिमेपासून कोकणात सुरू होणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवाला दशावतारी नाट्यप्रयोग कोरोनाबाबतचे सरकारचे नियम व अटींचे पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेत मिशन बिगिन अंतर्गत कोरोनाबाबतचे नियम पाळत सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या कार्यक्रमांचे आयोजन करताना कोरोनाबाबतच्या केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. या निर्णयामुळे जत्रोत्सवातील लोककला सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

































































