
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण शहरातील पाग येथील घरावर मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घराच्या आवारात पेट्रोलच्या बाटल्या, दगड, स्टम्प फेकलेले आढळून आले. मात्र हा हल्ला सरकारच्या माध्यमातूनच झाला, असा थेट आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यासंबंधी भास्कर जाधव आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मुंबईत माझ्या संरक्षणासाठी खूप मोठा फौजफाटा होता. परंतु रात्री 11-12 च्या दरम्यान माझी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. त्यानंतर काही तासांमध्येच माझ्या चिपळूणच्या घरावर हल्ला झाला. यातून हेच स्पष्ट होत आहे की यामागे सरकारचाच हात आहे, असा आरोप जाधव यांनी केला.
यावेळी सरकारवर आरोप करत भास्कर जाधव म्हणाले की, ‘घरावर हल्ला झाला तेव्हा मी मुंबईत होतो. माझ्या संरक्षणासाठी खूप मोठा फौजफाटा होता. पण रात्री 11-12 च्या दरम्यान माझी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. माझ्याजवळ एकही पोलीस ठेवला नाही. माझ्या चिपळूणच्या राहत्या घराचं संरक्षण काढून घेतलं. मुंबईतल्या घरासमोरचं संरक्षण काढलं. मला वैयक्तिक रित्या महाराष्ट्रात फिरण्यासाठी जे संरक्षण होतं, तेही काढून घेतलं. त्यानंतर अवघ्या दोन तासात माझ्या घरावर हल्ला होतो. याचा अर्थ हा हल्ला सरकारच्याच सहकार्याने आणि सरकारच्याच माध्यमातून गुंडांनी केलाय, हे स्पष्ट झाले आहे.
गेली अडीच वर्ष उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. आज भाजप नेते सभ्यतेच्या गोष्टी करत आहेत, त्यांच्या नेत्यांचा मान राखा म्हणत आहेत. त्याच भाजपाच्या नेत्यांचे उद्धव ठाकरेंबद्दलचे एक एक वक्तव्य तपासून पहा. राजकारणाचा स्तर त्यांनीच खाली नेला आहे, असे जाधव यांनी म्हणाले.

























































