
मुंबई-गोवा, मुंबई-पुणे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या राज्यातील तीन प्रमुख महामार्गांवर अपघातांमध्ये गेल्या तीन वर्षांत एक हजारांवर बळी गेल्यानंतर सरकारला जाग आली आहे. महामार्गांवरील अपघातातील जखमींना उपचारांसाठी वेळेवर रुग्णालयांपर्यंत नेता यावे म्हणून हवाई ऍम्ब्युलन्स सेवा सुरू केली जाणार आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत ही सेवा सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे.
राज्यात दरवर्षी सुमारे 15 हजार वाहन अपघात होतात. महामार्गांवर होणाऱया अपघातांमधील जखमी व्यक्ती वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. गोल्डन अवरमध्ये त्यांना उपचार उपलब्ध झाले तर हजारो लोकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. मुंबई-गोवा, मुंबई-पुणे किंवा 2022 पासून सुरू झालेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग या तीनही महामार्गांवर वाहन अपघात झाला तर जखमींपर्यंत मदत पोहोचण्यासच विलंब होतो. अपघातानंतरच्या पहिल्या एक तासात म्हणजे गोल्डन अवरमध्ये जखमींना उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचवले जाऊ शकते. परंतु तशी प्रभावी यंत्रणाच या महामार्गांवर आवश्यक उभारली गेलेली नाही. महामार्गांवरील वाहतूक कोंडी, रुग्णालयापर्यंतचे अंतर आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळत नाहीत. त्यामुळे उपचारांअभावी मृत्यू होण्याचे प्रमाण आजही अधिक आहे.
मुंबई-गोवा महामार्ग
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 18 वर्षांपासून अपूर्ण आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तीन जिह्यांमध्ये विभागलेल्या या महामार्गावर अपघातांमध्ये गेल्या तीन वर्षांत शेकडो लोकांनी जीव गमावला. रत्नागिरी जिह्यात जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 या 14 महिन्यांमध्ये 399 अपघातांमध्ये 137 मृत्यू झाले. याच कालावधीत केवळ रत्नागिरीमध्ये गंभीर अपघातांमध्ये 115 पुरुष आणि 22 महिलांचा मृत्यू झाला. रायगड जिह्यात जानेवारी ते सप्टेंबर 2023 या नऊ महिन्यांच्या कालावधीत 218 मृत्यू झाले. इंदापूर-वडपाले या 26.7 किलोमीटरच्या पट्टय़ात 170 अपघातांमध्ये 97 मृत्यू झाले.
महामार्ग बनलेत मृत्यूचे सापळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग
महाराष्ट्र पोलीस आणि सेव्ह लाईफ फाऊंडेशन यांच्या आकडेवारीनुसार समृद्धी महामार्गावर 2023 मध्ये 134 अपघात झाले, त्यात 151 लोकांचा मृत्यू झाला. 2024 मध्ये 137 अपघातांमध्ये 126 लोक दगावले. 2025 मध्ये 185 अपघातांमध्ये 152 लोकांनी प्राण गमावले. यातील बहुतांश मृत्यू हे वेळेवर उपचार न मिळाल्याने झाल्याचे सांगितले जाते.
15 नोव्हेंबरपर्यंत कार्यपद्धती
यासंदर्भात आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वाहतूक पोलीस अधीक्षक सुनील भारद्वाज आदींच्या उपस्थितीत एक बैठक झाली. त्यात या तीनही महामार्गांवर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले. 15 नोव्हेंबरपर्यंत या प्रकल्पासाठी कार्यपद्धती बनवली जाणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 18 मार्च 2026 रोजी राज्यसभेत महाराष्ट्र वाहतूक विभागाच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई-पुणे महामार्गावर 2023 मध्ये 154 अपघात झाले, त्यात 65 लोक दगावले. 2024 मध्ये 90 तर 2025 मध्ये 68 लोकांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला.






























































