थर्ड पार्टी इन्श्युरन्स स्वस्त, सरकार जीएसटीत करणार कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

प्रत्येक वाहनमालकासाठी थर्ड पार्टी विमा सक्तीचा आहे. मात्र जीएसटीमुळे त्यांना मोठी रक्कम भरावी लागते आणि भुर्दंड सहन करावा लागतो. परंतु आता वाहनमालकांना दिलासा मिळणार आहे. कारण केंद्र सरकार थर्ड पार्टी विम्यावर लावण्यात येणारा जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा करात कपात करणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सरकार लवकरच आणणार आहे. सध्या थर्ड पार्टी विम्यावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येते. जीएसटीत कपात केल्याने वाहनमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

थर्ट पार्टी विम्याच्या प्रीमियमवर मोठ्या प्रमाणावर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीबाबत पंतप्रधान कार्यालयात एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कर कपातीबाबत आर्थिक सेवा पुरवणाऱ्या विभागाला सल्ला देण्यास सांगण्यात आले असून त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव जीएसटी परिषदेच्या पुढच्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. वाहनमालकांना थर्ड पार्टी विमा घेण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे या प्रकरणात जीएसटी दर नव्याने आकारण्यात येण्याची गरज असल्याचे काही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जीएसटीच आकारू नका
ट्रक्स असोसिएशनने थर्ड पार्टी विम्यावर जीएसटीच आकारू नका असे म्हटले असून यावरही विचार करण्यात येईल असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. जीएसटी पूर्णपणे काढून टाकल्यास मोठ्या ट्रकसाठी भराव्या लागणाऱ्या प्रीमियममध्ये तब्बल पाच ते सात हजार रुपयांची कपात होईल आणि ट्रकचालकांना दिलासा मिळेल, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या बाल मलकित सिंह यांनी सांगितले.

50 टक्क्यांहून अधिक वाहनांचा विमाच नाहीॉ
सध्या नोंदणी झालेल्या 50 टक्के वाहनांहून अधिक वाहनचालकांकडे विम्याचे कवच नसल्याचे समोर आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने परिवहन मंत्रालयाला सर्व वाहनांना थर्ड पार्टी विमा सक्तीचा करण्यासाठी जास्तीत जास्त वाहनचालकांमध्ये जनजागृती करावी तसेच याबाबत सर्व राज्यांना एका परिपत्रकाद्वारे कळवावे असे म्हटले आहे.